आखाती देशांतील वादांमुळे कच्च्या तेलाचा भडका

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 जून 2017

भारत आणि कतारदरम्यानचे राजकीय संबंध मजबूत असून भारताकडून कतारला होणारी निर्यात 100 कोटी डॉलरवर पोहोचली आहे. दोन्ही देशांमध्ये 1578 कोटी रुपयांचा व्यापार होतो. कतारकडे जगातील सर्वाधिक मोठे नैसर्गिक वायूचे भांडार आहे.

नवी दिल्ली - आखाती देशांमधील वाढत्या वादांचा फटका कच्च्या तेलाला बसत आहे. यामुळे कच्च्या तेलाचे भाव वाढत असल्याचे चित्र आहे. सौदी अरेबियासह इतर चार देशांनी कतारसोबतचे संबंध तोडल्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये वाढ दिसून आली. सोमवारी जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाचे भाव 1.5 टक्‍क्‍यांनी वाढले होते. दिवसाखेर कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅरल 50.74 डॉलरवर पोहोचले होते.

कतार हा द्रवरूप नैसर्गिक वायुचा (एलएनजी) सर्वांत मोठा निर्यातदार देश आहे. त्यामुळे या वादाचा फटका तेलाच्या किंमतीना बसणार आहे. दरम्यान तेल उत्पादक देशांची संघटना असणाऱ्या ओपेकने कच्च्या तेलाचे उत्पादन घटविण्याच्या मर्यादेला पुढील वर्षांपर्यंत वाढविण्यास मंजूरी दिली आहे. कतार व सौदी अरेबिया हे दोन्ही देश ओपेक संघटनेचे सदस्य आहेत.

कच्च्या तेलाच्या भावात चढउतार
मागील एका महिण्यापासून कच्च्‌ या तेलाच्या भावामध्ये सातत्याने चढउतार पहावयास मिलत आहे. गेल्या महिण्यापासून कच्च्या तेलाच्या किंमती 3 टक्‍क्‍यांनी वाढल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षापासून कच्च्‌ या तेलाचा सर्वाधिक भाव 60.21 डॉलर प्रति बॅलर इतका राहिला आहे. तर याच दरम्यान 46.47 डॉलर प्रतिबॅलर इतक्‍या निचांकावरही तेलाच्या किंमती आल्या होत्या. कच्च्या तेलाच्या भावातील चढउतारामुळे सरते वर्ष संमिश्र ठरले.

भारतासोबत कतारचे संबंध मजबूत
भारत आणि कतारदरम्यानचे राजकीय संबंध मजबूत असून भारताकडून कतारला होणारी निर्यात 100 कोटी डॉलरवर पोहोचली आहे. दोन्ही देशांमध्ये 1578 कोटी रुपयांचा व्यापार होतो. कतारकडे जगातील सर्वाधिक मोठे नैसर्गिक वायूचे भांडार आहे. कतारच्या एकुण निर्यातीपैकी 15 टक्के नैसर्गिक वायूची निर्यात एकट्या भारताला केली जाते.

Web Title: Oil Prices surge due to conflict in Middle East