तेल विहिरीच्या आगीत 15 जण ठार 

वृत्तसंस्था
Thursday, 26 April 2018

इंडोनेशियातील सुमात्रा बेटातील एकेह प्रांतातील एका नागरी वस्तीत ही दुर्घटना घडली. तेलविहिरीला मंगळवारी सायंकाळी लागलेली आग विझवण्याचे काम बुधवारपर्यंत सुरू होते. या आगीत अनेकांची घरे उद्‌ध्वस्त झाली आहेत.

बंडा ऍचेह : इंडोनेशियातील एका बेकायदा तेल विहिरीला लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या पंधरावर पोचली आहे. या घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सिगारेटमुळे विहिरीला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
 
इंडोनेशियातील सुमात्रा बेटातील एकेह प्रांतातील एका नागरी वस्तीत ही दुर्घटना घडली. तेलविहिरीला मंगळवारी सायंकाळी लागलेली आग विझवण्याचे काम बुधवारपर्यंत सुरू होते. या आगीत अनेकांची घरे उद्‌ध्वस्त झाली आहेत. आगीच्या ज्वाळा 70 मीटर उंचीपर्यंत जात होत्या. त्यात परिसरातील घरे भक्ष्यस्थानी पडली. एवढेच नाही, तर नारळाची झाडेदेखील जळाली आहेत. आतापर्यंत 15 जण मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. अजूनही आग भडकलेलीच असून ते विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. 

विहीर परिसरातील घरात किती जण अडकले आहेत, याची माहिती उपलब्ध नसल्याचे आपत्कालीन व्यवस्थापनच्या अधिकाऱ्याने सांगितले. सिगारेटमुळे तेलविहिरीला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कारण, परिसरात राहणारे अनेक नागरिकांना धूम्रपानाचे व्यसन होते आणि तेल मिळवण्यासाठी नागरिकांची परिसरात सतत गर्दी असायची, असे पोलिसांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Oil Tank 15 peoples have been dead