
US : चर्चमध्ये गोळीबार, ४८ तासातील दुसरी घटना
एका बंदुकधारी व्यक्तीने लॉस एंजेलिसजवळील चर्चमध्ये रविवारी गोळीबार (Church Firing America) केला. यामध्ये एक जण ठार झाला असून इतर चार जण गंभीर जखमी आहेत. अमेरिकेत गेल्या ४८ तासातील ही दुसरी गोळीबाराची घटना आहे. बफेलो येथील सुपरमार्केटमध्ये शनिवारी गोळीबार झाला होता.
चर्च गोळीबारातील बंदूकधारी व्यक्ती एक आशियाई प्रौढ पुरुष असल्याची माहिती असून त्याने आशियाई आणि तैवानी वंशाच्या नागरिकांवर हल्ला केला. यामध्ये १ जण ठार झाला, तर चार जण गंभीर झाले. त्यानतंर चर्चमध्ये जाणाऱ्या नागरिकांनी त्याला ताब्यात घेतले. त्याचे पाय बांधून शस्त्रे ताब्यात घेतली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, बफेलो येथील सुपरमार्केट येथे शनिवारी एका गौरवर्णिय तरुणानं गोळीबार केला. यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला, तर ३ जण गंभीर जखमी होते. आरोपीने या गोळीबाराचा लाईव्ह व्हिडिओ देखील तयार केला. वर्णभेदातून ही घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. पेटन ग्रेंड्रोन, असं आरोपीचे नाव असून त्याने वयाच्या १७ व्या वर्षी महाविद्यालयात गोळीबार करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्याला मानसिक रोगी समजून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, तो दीड दिवसातच रुग्णालयातून बाहेर पडला होता.