
Russia Ukraine War: ‘ऑपरेशन गंगा’ ठरले संकटमोचक!
नवी दिल्ली- रशियाने हल्ला केल्यानंतर युक्रेनमध्ये शिक्षण घेणाऱ्या भारतासह असंख्य देशातील विद्यार्थ्यांसमोर संकट उभे राहिले.
परंतु ‘ऑपरेशन गंगा’तर्गत युक्रेनमधील भारतातील हजारो विद्यार्थ्यांना रुमानिया, हंगेरी, पोलंड, मोल्दोवा आणि स्लोव्हाकिया या देशांच्या मदतीने भारतात आणण्यात आले.
वर्षभरापूर्वी नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना वाचवणे आणि तेथून सुरक्षित आणणे मोठे आव्हान होते.
परंतु सरकारने हे प्रकरण अतिशय संयमाने आणि धैर्याने हाताळले. युक्रेनमध्ये क्षेपणास्त्र हल्ले होत असताना भारतीयांना आणि भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी सरकारने ऑपरेशन गंगा अभियान राबविले.
यासाठी एका कृतिदलाची स्थापना करण्यात आली. त्यात केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी, ज्योतिरादित्य शिंदे, किरेन रिजिजू आणि जनरल व्ही. के. सिंह यांचा समावेश होता.या मोहिमेच्या समन्वयासाठी त्यांना युक्रेनच्या शेजारील देशात पाठवण्यात आले.
‘ऑपरेशन गंगा’च्या वर्षपूर्तीनिमित्त एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या मोहिमेची माहिती दिली. रशिया-युक्रेन युद्ध सुरू होण्यापूर्वी १५ फेब्रुवारी २०२२ रोजी युक्रेनची राजधानी किव्ह येथील भारतीय दुतावासाने महत्त्वाची सूचना जारी केली.
लवकरात लवकरात देश सोडा, आपल्या घरी जा, असे आवाहन दुतावासाने भारतीय नागरिकांना केले. एक परीने भारतीय अधिकाऱ्यांना संघर्षाची कुणकूण लागली होती. युद्ध केव्हाही भडकू शकते,
असा अंदाज व्यक्त केला जात होता आणि तसेच घडले. यातही सर्वात मोठे आव्हान होते ते भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे. युद्ध थांबण्याचे चिन्हे नव्हती. अखेर भारत सरकारने मोहीम सुरू केले.
या अभियानाचा संपूर्ण खर्च हा सरकारने उचलला. परंतु युद्धामुळे युक्रेनची हवाई हद्द बंद करण्यात आली होती.
त्यामुळे भारत सरकारने विद्यार्थ्यांसाठी पोलंड, रुमानिया, हंगेरी, स्लोव्हाकिया येथून उड्डाणे सुरू केली.
परराष्ट्र मंत्रालयाने २४/७ हेल्पलाइन सुरू केली. २७ फेब्रुवारी रोजी भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन पहिले विमान दिल्लीत दाखल झाले.
ऑपरेशन गंगा कसे नाव पडले
भारतीय विद्यार्थ्यांना रुमानियाची राजधानी बुखारेस्ट येथून एअरलिफ्ट करण्यात आले. या मोहिमेसाठी हरदिप पुरी सिंह,
ज्योतिरादित्य शिंदे, किरेन रिजिजू, जनरल व्ही. के. सिंह हे पोलंड, हंगेरी, स्लोव्हाकिया आणि रुमानियाला गेले.
तेथील राजनैतिक अधिकारी आणि मंत्र्यांशी संवाद साधला. विमानतळावर भारतीयांच्या मनात विश्वास निर्माण केला. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या मतदारसंघात वाराणसीत आले होते.
त्यावेळी या अभियानाची चर्चा सुरू होती. त्याच्या नावावर बरेच विचारमंथन झाले आणि ऑपरेशन गंगा या नावावर एकमत झाले.
गंगा ही केवळ नदी नसून ती भारतीयांसाठी पूजनिय आहे. ज्याप्रमाणे गंगेला ‘माँ गंगा’ असे म्हटले जाते, ती आपले संरक्षण करते. त्याचप्रमाणे ही बचाव मोहीम आपल्या मुलांना सुरक्षितपणे आणण्यासाठी होती.
म्हणून त्याला ऑपरेशन गंगा असे नाव देण्यात आल्याचे एका वरिष्ठ मंत्र्यांनी सांगितले.
किती दिवस अभियान
ऑपरेशन गंगा २६ फेब्रुवारी ते ११ मार्चपर्यंत सुरू होते. यानुसार शेकडो भारतीय विद्यार्थी रुमानिया, हंगेरी, पोलंड, मोल्दोवा, स्लोव्हाकिया येथून भारतात परतले.
एका आकडेवारीनुसार, युद्धाच्या वेळी सुमारे २० हजाराहून अधिक भारतीय नागरिक आणि विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले होते. त्यात १८ हजार विद्यार्थी होते.
बुखारेस्टहून पहिले उड्डाण झाले आणि ते २४९ विद्यार्थ्यांना घेऊन २७ फेब्रुवारी रोजी दिल्लीत आले. ६ मार्चपर्यंत एकूण ७६ उड्डाणांतून १६ हजार भारतीयांना आणण्यात आले.
भारतीय हवाई दल, इंडिगो, एअर इंडिया, स्पाइसजेट यासारख्या विमान सेवेच्या मदतीने नागरिकांना परत आणण्यात आले.
६०० विद्यार्थ्यांच्या शेवटच्या गटाला सुरक्षा दलाच्या कॉरिडॉरच्या मदतीने सुमी येथून आणण्यात आले. बचावकार्य शेवटच्या टप्प्यात असताना जोखीमही वाढली होती, असे अधिकाऱ्याने सांगितले.
कर्नाटकच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
युक्रेनवर हल्ला झाल्यानंतर भारतीय नागरिकांना मायदेशी आणले जात असताना एका विद्यार्थ्यांचा बॉम्बहल्ल्यात मृत्यू झाला. नवीनकुमार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून होते आणि ते कर्नाटकचे रहिवासी होते.
नवीनकुमार हे तेथे वैद्यकीय शिक्षण घेत होते. खारकिव्ह येथे १ मार्च रोजी सकाळी भीषण बॉम्ब हल्ल्यात नवीन कुमार यांचा मृत्यू झाला.
मोदी-पुतीन यांची चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ मार्च २०२२ रोजी रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतीन आणि युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करून
भारतीय नागरिकांना कॉरिडॉरमधून बाहेर काढण्याबाबत चर्चा केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक घडामोडींची माहिती घेत होते.