इसिसच्या हिंसक धोरणांची ओसामास होती चिंता

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

इस्लामिक राज्यासाठी (स्टेट) अद्यापी अनुकूल परिस्थिती झाली नसल्याने तेथील सरकारविरोधात युद्ध करण्याची घाई करु नये, अशा इशाऱ्याबरोबरच "आवश्‍यकता नसल्यास' रक्तपात करण्यात येऊ नये, असा सल्लाही त्याने इतर जिहादी संघटनांना दिला आहे

वॉशिंग्टन - अल कायदा या जागतिक दहशतवादी संघटनेचा कुख्यात म्होरक्‍या ओसामा बिन लादेन याला इस्लामिक स्टेट (इसिस) या अन्य दहशतवादी संघटनेकडून अवलंबिण्यात येत असलेल्या हिंसक व आक्रस्ताळ्या धोरणाबद्दल चिंता वाटत होती, असे अमेरिकेची गुप्तचर संस्था असलेल्या "सीआयए'कडून नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या काही कागदपत्रांमधून स्पष्ट झाले आहे. गेल्या काही वर्षांत अल कायदाच्या तुलनेमध्ये इसिसचा प्रभाव वाढल्याचे दिसून आले आहे. या पार्श्‍वभूमीवर ओसामाची इसिससंदर्भातील भूमिका या कागदपत्रांमधून दृष्टोपत्तीस पडली आहे.

ओसामा याला ठार करण्यात आल्याच्या काहीच दिवसांपूर्वीचे हे निरीक्षण आहे. अमेरिकेविरोधातील लढाईमध्ये जगभरातील इतर जिहादी संघटनांना एकत्रित ठेवण्याचा ओसामाचा प्रयत्न या कागदपत्रांमधील नोंदींमधून दिसून आला आहे. याशिवाय, ओसामाने मुलांना शरीरामध्ये "इलेक्‍ट्रॉनिक चिप' बसवून त्यांच्यावर लक्ष ठेवले जाण्याच्या शक्‍यतेविषयी त्यांना सावध केले आहे. तसे अल कायदाच्या उत्तर आफ्रिकेमधील दहशतवाद्यांना हस्तमैथुन करणे गैर नसल्याचेही त्याने सांगितले आहे.

लादेन कुटूंबीयांचा मूळ देश असलेल्या येमेनमधील अल कायदाच्या शाखेच्या कामकाजावर त्याचे लक्ष विशेषत्वे केंद्रित झाले असल्याचे निष्पन्न झाले आहे. इस्लामिक राज्यासाठी (स्टेट) अद्यापी अनुकूल परिस्थिती झाली नसल्याने तेथील सरकारविरोधात युद्ध करण्याची घाई करु नये, असा इशाराही ओसामाने अरेबियामधील अल कायदाच्या शाखेचा संस्थापक नासीर अल-वुहाय्शी याला दिला आहे. याचबरोबर, 'आवश्‍यकता नसल्यास' रक्तपात करण्यात येऊ नये, असा सल्लाही त्याने इतर जिहादी संघटनांना दिला आहे.

"उम्माचे (मुस्लिम बंधुंचे) शत्रु हे एखाद्या राक्षसी झाडासारखे आहेत. या झाडाचे खोड हे अमेरिका आहे,'' असे ओसामाने म्हटले आहे.

Web Title: Osama worried over IS tactics