डोकलाम: नवा दिवस, नवा चिनी इशारा !!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

भारत व चीन द्विपक्षीय संबंध व प्रादेशिक स्थिरता व शांततेचा विचार करत चिनी सैन्याकडूनही या प्रकरणी अत्यंत संयम ठेवण्यात आला आहे. मात्र या संयमास अखेर मर्यादा आहे

बीजिंग - डोकलाम येथे भारतीय लष्कर व चिनी सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकल्याने निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर चीनकडून पुन्हा एकदा नवा इशारा देण्यात आला आहे. या प्रकरणासंदर्भात चीनकडून आत्तापर्यंत अत्यंत संयम ठेवण्यात आला असला; तरी या संयमास मर्यादा आहेत, असा नवा इशारा चिनी संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आला आहे.

"डोकलाम येथे ही घटना घडल्यापासून चीनने राजनैतिक मार्गांचा अवलंब करुन सामोपचाराने हे प्रकरण शांत करण्याचा निकराचा प्रयत्न केला आहे. भारत व चीन द्विपक्षीय संबंध व प्रादेशिक स्थिरता व शांततेचा विचार करत चिनी सैन्याकडूनही या प्रकरणी अत्यंत संयम ठेवण्यात आला आहे. मात्र या संयमास अखेर मर्यादा आहे,'' असे चिनी संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते रेन गुओकिआंग यांनी म्हटले आहे.

डोकलाम येथील तणावपूर्ण परिस्थिती अद्याप निवळलेली नसून संतप्त चीनकडून या पार्श्‍वभूमीवर सतत नवनवीन इशारे देण्यात येत आहेत. चिनी सैन्याने भारतावर दबाव आणण्यासाठी तिबेट व शिनजियांगमध्ये सैन्याची आक्रमक हालचालही केली आहे. मात्र भारताकडूनही या प्रकरणी स्पष्ट भूमिका घेण्यात आली आहे.

डोकलाम घटनेचे पडसाद उत्तराखंड राज्यात उमटले आहेत. उत्तराखंडमधील चमोली येथे चीनकडून घुसखोरी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.

Web Title: Our restraint has a bottom line: China on Doklam standoff