"हॅकिंग'चे पडसाद: ओबामांचा रशियास इशारा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

आमच्या देशामधील निवडणुकीमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न एखाद्या परकीय सरकारने केला; तर त्याविरोधात कारवाई करावयास हवीच; आणि ती तशी केली जाईल. या कारवाईचे ठिकाण व वेळ आम्ही ठरवू

वॉशिंग्टन - अमेरिकेमधील अध्यक्षीय निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना विजय मिळवून देण्यासाठी रशियाकडून "हॅकिंग' घडविण्यात आल्याच्या आरोपाचे अमेरिकेमध्ये गंभीर पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. रशियाच्या या हस्तक्षेपाविरोधात कडक कारवाई करण्याचा निर्धार अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्यक्त केला आहे. रशियाने अध्यक्षीय निवडणुकीमध्ये हॅकिंग घडविल्याचा आरोप करण्यात आला असला; तरी यासंदर्भातील पुरावे उघड करण्यात आलेले नाहीत.

""आमच्या देशामधील निवडणुकीमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न एखाद्या परकीय सरकारने केला; तर त्याविरोधात कारवाई करावयास हवीच; आणि ती तशी केली जाईल. या कारवाईचे ठिकाण व वेळ आम्ही ठरवू. यासंदर्भातील माझ्या भावना पुतीन यांना चांगल्या माहिती आहेत; कारण मी त्यांच्याशी थेट बोललो आहे,'' असे ओबामा म्हणाले.

अर्थात, येत्या 20 जानेवारी रोजी ओबामा हे औपचारिकरित्या अध्यक्षीय पदावरुन पायउतार होणार असल्याने रशियाविरोधात नेमकी कारवाई कशी होणार, यासंदर्भात अस्पष्टता असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

अमेरिकेमध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत घडविण्यात आलेल्या "हॅकिंग'मध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे व्यक्तिश: सहभागी होते, असे अमेरिकेच्या गुप्तचर खात्यामधील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री व डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षीय उमेदवार हिलरी क्‍लिंटन यांच्याविरोधात सूड घेण्यासाठी पुतीन यांनी निवडणुकीमध्ये हस्तक्षेप केल्याचे या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

याआधी, "दी वॉशिंग्टन पोस्ट' या अमेरिकेमधील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रानेही रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना विजय मिळवून देण्यासाठी रशियाने अमेरिकेमधील महत्त्वपूर्ण संस्था व व्यक्‍तींचे इमेल्स हॅक केल्याचे म्हटले होते. या वृत्तास अमेरिकेच्या गुप्तचर खात्यामधील अधिकाऱ्यांनीही आता दुजोरा दिला आहे. दरम्यान, अमेरिकेचे होणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा आरोप हास्यास्पद असल्याची टीका केली आहे. 

Web Title: Outgoing Obama warns Russia