Turkey and Syria Earthquake : तुर्की, सीरियात भूकंप; २३०० हून अधिक बळी; प्रचंड विध्वंस; हजारो जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

over 2300 killed earthquakes jolt turkey syria hundreds still under debris eight thousand injured updates

Turkey and Syria Earthquake : तुर्की, सीरियात भूकंप; २३०० हून अधिक बळी; प्रचंड विध्वंस; हजारो जखमी

अंकारा : तुर्की आणि सीरिया हे दोन देश आज विनाशकारी भूकंपामुळे हादरले. सुमारे बारा तासांच्या अवधीमध्ये या देशांना तीन मोठे धक्के सहन करावे लागले यामुळे शेकडो इमारती कोसळल्या असून २३०० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले असून आठ हजारांहून अधिकजण जखमी झाले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेसह जगभरातील अनेक देश मदतीसाठी पुढे आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या आपत्तीनंतर शोक व्यक्त करत मदत देऊ केली आहे. तुर्कियेला भूकंपाचा पहिला धक्का स्थानिक वेळेनुसार पहाटे चार वाजता (भारतीय वेळेनुसार सकाळी ६.३० वा.), दुसरा सकाळी दहाच्या सुमारास, तर तिसरा दुपारी तीनच्या सुमारास बसला. यानंतरही ठराविक काळाने दोन्ही देशांना हादरे बसत होते.

भूकंपाचा केंद्रबिंदू तुर्कीमधील गाझीआंतेप शहराजवळ असल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून जवळपास १८ किलोमीटर खोलीवर होता.

तीव्र भूकंपामुळे मोठा विध्वंस झाला असून हजारो इमारती कोसळल्या आहेत. भूकंपामुळे दोन्ही देशांत मिळून दोन हजार तीनशेंहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून आठ हजारांहून अधिक जण जखमी झाले आहेत. इमारतींखाली शेकडो जण गाडले गेले असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. भूकंपानंतर येथे बचावकार्याला वेग आला आहे. इमारतींच्या मलब्यामधून जखमी व मृत व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. लेबनॉनमध्येही ४० सेकंदापर्यंत धक्का जाणवला.

तुर्कीआणि सीरियातील सीमेवरील भागात आज पहाटे भूकंपाच्या झटक्याने इमारती हलू लागल्याने लोक रहिवासी झोपेतून उठून घराबाहेर पळाले. नंतरही धक्के जाणवत भयभीत झालेले नागरिक कडाक्याच्या थंडीत बाहेरच थांबले होते.

तुर्कीमधील अदाना शहरात एका इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेत असताना ‘जास्त काळ तगून राहण्याची शक्ती माझ्यात नाही,’ असे एक व्यक्ती ओरडून सांगत असल्याचे ऐकू आल्याचे येथील एक रहिवासी आणि विद्यार्थी पत्रकाराने सांगितले. दियारबाकील शहरातही इमारतींचे ढिगारे जागोजागी दिसत होते. क्रेनच्या साह्याने मदत पथकाने तेथे बचावकार्य सुरू केले आहे.

सीरियात दीर्घकालीन युद्धामुळे येथील कोट्यवधी लोक विस्थापित झाले असून कठीण परिस्थितीत जगत आहे. त्यातच आजच्या भूकंपाने संकटात भर पडली आहे. तुटपुंज्या प्रमाणातील आरोग्य केंद्र भूकंपातील जखमींमुळे भरली आहेत. अत्मेहमधील डॉ. मुहिब काद्दोर यांनी वृत्तसंस्थेला दूरध्वनीवरून माहिती देताना देशात शेकडोजण मरण पावले असल्याची भीती व्यक्त केली.

आपत्कालीन संघटना ‘व्हाइट हेल्मेट’चे राहिद सलाह म्हणाले, की काही ठिकाणच्या वसाहती भूकंपात पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत. हानिकारक ठरलेल्या या भूकंपानंतरही तुर्कियेत अनेक धक्के जाणवले. त्यातील एक ६.६ रिश्‍टरस्केल क्षमतेचा होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सीरियातील अलेप्पो आणि हामा तसेच तुर्कीतील दियारबाकीर या भागातील दोन्ही सीमांवरील शेकडो इमारती कोसळल्याने लोक बेघर झाले आहेत. गोठवणाऱ्या थंडीत रस्त्यावर आसरा न घेण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी लोकांना केले आहे. त्यासाठी परिसरातील मशिदी खुल्या केल्या आहेत.

भारताकडून मदतीचा हात

तुर्कीतील भीषण भूकंपामुळे झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या हानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की, तुर्कीमध्ये भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीमुळे खूप दुःख झाले आहे. या दु:खाच्या काळात भारत तेथील जनतेच्या पाठीशी उभा आहे आणि आपत्तीच्या या काळात त्यांना सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.

बंगळूर येथील इंडिया ‘एनर्जी वीक २०२३’मध्ये बोलताना त्यांनी ही घोषणा केली. तुर्कीतील विध्वंसक भूकंप आपण सगळ्यांनी पाहिला असेल. यामध्ये अनेक लोकांचे जीव गेले आहेत तसेच मोठी वित्तहानी देखील झाली आहे. त्याच्या शेजारील देशामध्येही या भूकंपाचे धक्के जाणवले असून नुकसानही झाले आहे. १४० कोटी भारतीयांकडून या भूकंपातील पीडितांप्रती सद्भावना व्यक्त करतो, असेही मोदी म्हणाले.