फक्त 8 जणांकडे जगातील निम्म्या लोकसंख्येइतकी संपत्ती...

वृत्तसंस्था
सोमवार, 16 जानेवारी 2017

जगातील अतिश्रीमंत व गरीब यांच्यामधील आर्थिक दरी ही गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक रुंदावली आहे. या समस्येवर केवळ भाषणे ठोकण्यापेक्षा खरी उपाययोजना करण्यात यावी, असे आवाहनही ऑक्‍सफॅमकडून करण्यात आले आहे.

लंडन - जगातील सुमारे निम्म्या लोकसंख्येकडे (3.6 अब्ज) असलेल्या संपत्तीइतकीच संपत्ती केवळ आठ जणांकडे एकवटली असल्याचे "ऑक्‍सफॅम' या जगप्रसिद्ध संस्थेच्या पाहणीमध्ये स्पष्ट झाले आहे. जागतिक स्तरावरील महत्त्वपूर्ण राजकीय नेते व उद्योगपती यांच्या स्वित्झर्लंडमधील दावोस शहरामधील परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर हा अहवाल प्रकाशित झाला आहे.

जगातील अतिश्रीमंत व गरीब यांच्यामधील आर्थिक दरी ही गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक रुंदावली असल्याचे निरीक्षण ऑक्‍सफॅमने नोंदविले आहे. याचबरोबर, या समस्येवर केवळ भाषणे ठोकण्यापेक्षा खरी उपाययोजना करण्यात यावी, असे आवाहनही संस्थेकडून करण्यात आले आहे. या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्यात न आल्यास अशा स्वरुपाच्या असमानतेच्या विरोधातील जनतेमध्ये असलेला संताप वाढून त्यामुळे मोठे राजकीय बदल घडण्याचा इशाराही संस्थेकडून देण्यात आला आहे.

"जगामधील प्रत्येक 10 पैकी 1 मनुष्य दिवसाला दोन डॉलर्सपेक्षाही कमी उत्पन्नावर जगत असताना इतक्‍या कमी जणांच्या हातामध्ये इतकी अमाप संपत्ती एकवटली जाणे हे योग्य नाही. असमानतेमुळे कोट्यवधी नागरिक गरिबीच्या आवर्तामध्ये ढकलले जात आहेत. यामुळे आपले समाज व लोकशाहीपुढे धोकादायक आव्हाने उभी राहत आहेत,'' असे विनी ब्यानयिमा या ऑक्‍सफॅमच्या कार्यकारी अध्यक्षांनी सांगितले.

गेल्या वर्षीच्या अभ्यास अहवालामध्ये निवडक 62 जणांकडे जगातील निम्म्या लोकसंख्येइतकी संपत्ती एकवटली असल्याचे निरीक्षण मांडण्यात आले होते. या अभ्यासासाठी ऑक्‍सफॅमने फोर्ब्सच्या माहितीचाही वापर केला आहे.

Web Title: Oxfam says 8 men as rich as half the world

टॅग्स