हाफिज सईदचा पाकिस्तानला धोका- पाक संरक्षणमंत्री

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

आंतरराष्ट्रीय दबावामुळेच सईदवर कारवाई करण्यात येत आहे, तसेच त्याच्या संघटनेवर आर्थिक निर्बंध घालण्यात येत आहेत. 

नवी दिल्ली- मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार हाफीज सईद हा पाकिस्तानसाठी धोकादायक आहे. समाजासाठी तो एक गंभीर धोका असून देशाच्या हितासाठी त्याला अटक करण्यात आली आहे, असे पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असीफ यांनी म्हटले आहे. 

हाफीज सईद याचे नाव दहशतवादविरोधी कायद्याअंतर्गत यादीत समाविष्ट करून त्याला पाकिस्तानात काही दिवसांपूर्वी स्थानबद्ध करण्यात आले आहे. 
हाफिज सईदचा दहशतवादविरोधी कायद्याच्या कक्षेत समावेश करण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयाचे भारताने स्वागत केले. हाफिज सईद आणि त्याच्या सहकाऱ्यांविरुद्धची कारवाई दहशतवाद, तसेच हिंसक कट्टरवादाच्या दुहेरी धोक्‍यापासून प्रदेशाला मुक्त करण्याच्या दिशेने पहिले तर्कशुद्ध पाऊल असल्याचे भारताने म्हटले आहे. 

अलीकडच्या काळात सईदच्या संदर्भात पाकिस्तानच्या भूमिकेत काही बदल होताना दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय दबावामुळेच सईदवर कारवाई करण्यात येत आहे, तसेच त्याच्या संघटनेवर आर्थिक निर्बंध घालण्यात येत आहेत. 

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता विकास स्वरूप यांनी सांगितले, की हाफिज सईद हा एक आंतरराष्ट्रीय दहशतवादी, मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्करे तैयबा/जमात उद दावा तसेच त्यांच्याशी संबंधित संघटनांच्या माध्यमातून पाकिस्तानच्या शेजारी देशांविरुद्ध दहशतवादी कारवाया करण्यासाठी जबाबदार आहे. 
 

Web Title: Pak minister says Hafiz Saeed threat to us