झिया म्हणाले, पाक अण्वस्त्र निर्मिती करणार नाही!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 27 जानेवारी 2017

पाकिस्तान अण्वस्त्र मिळविण्याची योजना आखत असल्याची विश्‍वसनीय माहिती अमेरिकेकडे असल्याचे वॉल्टर्स यांनी मला सांगितले. मला हे ऐकून दु:ख झाले.

इस्लामाबाद - पाकिस्तान अण्वस्त्राची निर्मिती करणार नाही, असे आश्‍वासन पाकचे लष्करी हुकूमशहा झिया उल हक यांनी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रिगन यांना दिल्याचे अमेरिकेची गुप्तचर संस्था असलेल्या "सीआयए'च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या कागदपत्रांमधून स्पष्ट झाले आहे.

जनरल झिया यांनी रिगन यांना लिहिलेल्या एका पत्रामध्ये यासंदर्भातील आश्‍वासन दिले होते. हे पत्र 5 जुलै, 1982 ला लिहिण्यात आले होते. पाकिस्तान छुप्या पद्धतीने अण्वस्त्रांची निर्मिती करत असल्याची चिंता रिगन यांनी व्यक्त केली होती. यास उत्तर देताना झिया यांनी अमेरिकेचे पाकिस्तानमधील राजदूत व्हर्नॉन वॉल्टर्स यांच्या हस्ते हे पत्र पाठविले होते. पाकिस्तान अण्वस्त्रनिर्मिती करत असल्याचा आरोप हा तथ्यहीन असल्याचा दावाही झिया यांनी केला होता.

"पाकिस्तान अण्वस्त्र मिळविण्याची योजना आखत असल्याची विश्‍वसनीय माहिती अमेरिकेकडे असल्याचे वॉल्टर्स यांनी मला सांगितले. मला हे ऐकून दु:ख झाले. पाकिस्तानचा आण्विक कार्यक्रम हा शांततेसाठीच आहे. आण्विक क्षेत्रामध्ये अमेरिकेच्या हितास धक्‍का पोहोचेल, असे पाऊल पाकिस्तानकडून कदापि उचलले जाणार नाही,'' असे झिया यांनी या पत्रामध्ये म्हटले आहे.

झिया यांच्या कार्यकाळामध्येच पाकिस्तानने आण्विक बॉंब मिळविल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्‍त केले आहे. या पार्श्‍वभूमीवर, झिया यांचा हा दावा पाकिस्तानच्या दुटप्पी आण्विक धोरणाचेच प्रतिबिंब असल्याचे मानले जात आहे.

Web Title: Pak wouldn’t acquire N-bomb, said Zia