नेपाळ पाठोपाठ पाकिस्तानचाही नवा नकाशा; भारताच्या भूभागावर दावा

वृत्तसंस्था
Tuesday, 4 August 2020

भारत आणि पाकिस्तानमधील संबंध स्फोटक बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नवी दिल्ली- भारत आणि पाकिस्तानमधील संबंध स्फोटक बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण पाकिस्तानने आपला नवा नकाशा जाहीर केला असून त्यात लडाख, जम्मू-काश्मीरमधील सियाचिन आणि गुजरातच्या जूनागढ भागावर आपला दावा सांगितला आहे. पाकिस्तानच्या या कृतीने दोन्ही देशातील संबंध अधिक ताणले जाणार आहेत. 

400

भारत आणि नेपाळमध्ये सीमा वाद निर्माण झाला असताना नेपाळने भारताचा काही भाग आपल्या नकाशामध्ये दाखववला आहे. नेपाळच्या पाऊलावर पाऊल ठेवत पाकिस्तानही तेच करु पाहात आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मंगळवारी एक बैठक घेतली होती. चर्चेनंतर त्यांनी पाकिस्तानचा नवा नकाशा लागू केला आहे. यात त्यांनी लडाख, जम्मू-काश्मीरचा सियाचिनसह गुजरातच्या जूनागढवरही आपला अधिकार सांगितला आहे. 

इम्रान खान यांनी कॅबिनेट बैठकीनंतर नवा नकाशा जाहीर केला आहे. यात सियाचिन पाकिस्तानचा भाग असल्याचं सांगण्यात आलं आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांनी दावा केला आहे की, भारत या ठिकाणी अवैधरित्या बांधकाम करत आहे. शिवाय पाकिस्तानने स्पष्ट सांगितलं आहे की, काही भागाचा नकाशामध्ये समावेश करण्यात आला आहे. 

मागील वर्षी 5 ऑगस्टला भारताने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 काढून टाकले होते. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने नवा नकाशा जाहीर केला आहे. 5 ऑगस्ट रोजी पाकिस्तानमध्ये काळा दिवस पाळला जाणार आहे. मंगळवारी माध्यमांशी संवाद साधताना इम्रान खान म्हणाले की, आज ऐतिहासिक दिवस आहे. पाकिस्तानने नवा नकाशा जाहीर करुन आपली मनिषा जाहीर केली आहे.

पराष्ट्रमंत्री महमूद कुरैशी यांनी नव्या नकाशाचा शालेय पाठ्यपुस्तकात समावेश होणार असल्याचं सांगितलं आहे. शिवाय आता भारताने व्यापलेला जम्मू-काश्मीर(IIOJK Or IOK) असं न म्हणता भारताने बेकायदेशीररित्या व्यापलेला जम्मू काश्मीर (IIOJK) असं म्हणण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

पाकिस्तान 5 ऑगस्ट रोजी काळा दिवस पाळणार आहे. या दिवशी सर्व टेलिव्हिजन वाहिन्या आणि रेडिओ स्टेशनला एक मिनिटासाठी पाकिस्तान आणि आझाद पाकिस्तानचे राष्ट्रगीत लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व टिव्ही वाहिनीतील सादरकर्त्यांनी काळा बँड घालायचा आहे. शिवाय सर्व वाहिन्यांचे लोगो या दिवशी काळ्या रंगात दाखवले जाणार आहेत. पाकिस्तानमध्ये या दिवशी भारताच्या कारवाईविरोधात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

(edited by-kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistan announces new political map