पाकिस्तानने रोखला भारतीय उच्चायुक्तांचा गुरुद्वार प्रवेश

वृत्तसंस्था
रविवार, 24 जून 2018

भारताकडून पाकिस्तानच्या या कृत्याचा निषेध केला जात आहे. अजय बिसारिया हे आपल्या पत्नीसह रावळपिंडीजवळ हसन अब्दल येथे असलेल्या पंजा साहिब या गुरुद्वारात जात असताना काल (शनिवार) त्यांना रोखण्यात आले.

इस्लामाबाद : पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त असलेले अजय बिसारिया यांना गुरूद्वारामध्ये जाण्यापासून रोखण्यात आल्याचा प्रकार समोर आला. यावर भारताने तीव्र संताप व्यक्त केला असून, याप्रकरणी पाकिस्तानच्या उपउच्चायुक्तांना समन्स जारी करण्यात आले आहे. अजय बिसारिया यांनी काल (शनिवार) गुरुद्वारामध्ये जाण्यासाठी सर्व आवश्यक परवानग्या घेतल्या असतानाही त्यांना गुरुद्वारामध्ये जाण्यापासून रोखण्यात आले.

याबाबतची माहिती मिळाल्यानंतर भारताकडून पाकिस्तानच्या या कृत्याचा निषेध केला जात आहे. अजय बिसारिया हे आपल्या पत्नीसह रावळपिंडीजवळ हसन अब्दल येथे असलेल्या पंजा साहिब या गुरुद्वारात जात असताना काल (शनिवार) त्यांना रोखण्यात आले. या गुरुद्वारात जाण्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या बिसारिया यांनी घेतल्या होत्या. मात्र, तरीही प्रवेश नाकारण्यात आल्यामुळे त्यांना इस्लामाबादला परतावे लागले होते.

दरम्यान, अजय बिसारिया यांना यापूर्वी एप्रिलमध्ये भारतीय भाविकांना भेटण्यासाठी जात असताना रोखण्यात आले होते. आताही गुरद्वारामध्ये प्रवेश नाकारण्यात आला. त्यानंतर ही दुसरी घटना आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan Denial Of Access of Indian High Commissioner to Gurdwara