पाकमध्ये चहा-बिस्कीटात कपात, वीज कापणार अन् म्हणे...

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या कार्यालयाचे 41 लाख रुपयांचे वीज बिल थकले आहे. वीज कोणत्याही क्षणी तोडली जावू शकते.

कराचीः पाकिस्तानला आर्थिक टचांईला मोठ्या प्रमाणात सामारे जावे लागत आहे. सरकारी कार्यालयांमधील बैठकीदरम्यान चहा-बिस्कीटांवर बंदी घालण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर पंतप्रधान इम्रान खान यांच्या कार्यालयाचे 41 लाख रुपयांचे वीज बिल भरले नसल्यामुळे वीज कापली जाऊ शकते.

पंतप्रधान इम्रान खान यांनी सरकारी खर्चावर कपात करण्यासाठी बैठकीदरम्यान देण्यात येणाऱया चहा-बिस्कीटांवर बंदी घातली आहे. यामुळे पैसे वाचू शकतात, असा अंदाज त्यांनी वर्तविला आहे. सरकारी भरतीही बंद करण्यात आली आहे. शिवाय, कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याने गाडी विकत घेऊ नयेत, असे आदेश देण्यात आले आहेत. दुसरीकडे इम्रान खान यांच्या कार्यालयाचे 41 लाख रुपयांचे वीज बिल थकले आहे. वीज बिल भरले नाही तर कोणत्याही क्षणी वीज तोडली जावू शकते, असे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, पंतप्रधान सचिवालय कार्यालयाला इस्लामाबाद इलेक्ट्रिक सप्लाय कंपनीला (IESCO) 41 लाख रूपयांपेक्षा अधिक रकमेचे बिल थकलेले आहे. गेल्या महिन्याचे 35 लाख रूपयांचे बिलही भरले गेले नाही. वारंवार विचारणा करूनही बिल भरले जात नाही, यामुळे इलेक्ट्रिक सप्लाय कंपनीने वीज जोडणी कापण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, पाकिस्तानातील आर्थिक परिस्थिती एवढी बिकट झाली आहे की सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. दुसरीकडे गझनवी क्षेपणास्त्राची चाचणी घेऊन युद्धाची भाषा करणाऱया पाकिस्तानवर नेटिझन्सनी टीका सुरू केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistan Economic downturn and ghaznavi missile