कर्णधार जिवाचे रान करेल : रमिझ राजा

शुक्रवार, 27 जुलै 2018

मला खात्री आहे पाकिस्तामधील परिस्थिती बदल्यासाठी इम्रान खान जिवाचे रान करेल. पाकिस्तानी जनतेने सगळ्यांना संधी दिली आहे. आता इम्रान खान यांना संधी मिळते आहे. लोकांच्या आशेचा इम्रान खान एक किरण आहेत. मला खरच चांगल्या बदलांची आशा आहे

इस्लामाबाद : पाकिस्तानातील निवडणुकांचे निकाल अंतिम टप्प्यात आले असताना माजी महान खेळाडू इम्रान खान यांचा पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्ष बहुमताकडे वाटचाल करतानाची बातमी पसरली.

१९९२ साली इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाने विश्वचषक जिंकला होता. लगेच त्यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ शौकत खानूम कॅन्सर हॉस्पिटल उभे करायला सर्वस्व पणाला लावले. गोरगरिबांकरता कॅन्सर सारख्या खराब आजाराचे उपचार कमीतकमी खर्चात व्हावेत याकरता शौकत खानूम हॉस्पिटलची उभारणी इम्रान खान यांनी केली. तीन वर्ष तो प्रकल्प उभारण्यात गेली. हॉस्पिटल प्रत्यक्षात उभे राहून गोरगरीब रुग्णांची सेवा करू लागल्यावर इम्रान खान यांनी समाजसेवेकरता पुढचे मोठे धाडसी पाऊल उचलताना चक्क सक्रिय राजकारणात उडी मारली. 

''इम्रान खान यांनी राजकारणात प्रवेश केल्याचे समजल्यावर सुरुवातीला आम्हांला वाटले की काहीतरी वेगळाच विचार आहे. समाजसेवेचे भूत मानगुटीवर बसले आहे. सत्य परिस्थिती समजल्यावर ते उतरेल आणि इम्रान राजकारणातून बाहेर पडतील. पण तसे न होता १९९६ पासून ते आज पर्यंत म्हणजे गेली २२ वर्ष आमचा कर्णधार लढतो आहे आणि आता चक्क पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी बसायला जवळ गेले आहेत. कमाल वाटते त्याच्या जिद्दीची'', इम्रान खान यांच्या सोबत १९९२ च्या विश्वचषक विजेत्या पाकिस्तानी संघाचे एक सदस्य रमिझ राजा 'सकाळ'शी बोलताना म्हणत होते. रमिझ राजा सध्या इंग्लंडमध्ये सुट्टी करता आले असल्याने त्यांच्याशी संपर्क साधला असता गप्पा झाल्या. 

''इम्रान खान यांच्यातील सर्वात कमाल गुण म्हणजे दूरदृष्टी आणि स्वप्नांचा पाठलाग करायची अशक्य जिद्द. मला स्पष्ट आठवते की १९९२ साली आम्ही विश्वचषक स्पर्धे अगोदर मुद्दाम सरावाकरता ऑस्ट्रेलियाला खूप लवकर गेलो होतो. सराव सामन्यात आम्ही सपाटून मार खाल्ला आणि एकदम मनातून खचून गेलो. संघाच्या बैठकीत निराशेचे वातावरण होते. सकारात्मक विचारात फक्त कर्णधार इम्रान होते. 'अब हमारी तय्यारी पुरी हो गयी है. अब ये वर्ल्डकप में हमें कोई हरा नहीं सकता', ते हसत हसत म्हणाले. ते चेष्टा करत नव्हते त्यांचा तो विश्वास होता.

मला वाटते तोच आत्मविश्वास त्यांचा राजकारणात काम करतानाचा आहे. त्यांना वाटते की पाकिस्तानची परिस्थिती सातत्याने चांगले काम केल्याने बदलेल आणि त्याकरता भ्रष्टाचाराला नाहीसे करण्याची गरज आहे'', रमिझ राजा इम्रान खान बद्दल बोलताना सांगत होते. ''मला खात्री आहे पाकिस्तामधील परिस्थिती बदल्यासाठी इम्रान खान जिवाचे रान करेल. पाकिस्तानी जनतेने सगळ्यांना संधी दिली आहे. आता इम्रान खान यांना संधी मिळते आहे. लोकांच्या आशेचा इम्रान खान एक किरण आहेत. मला खरच चांगल्या बदलांची आशा आहे'' असे रमिझ राजा म्हणाले.

Web Title: Pakistan Election