
Imran Khan Arrested : भेटवस्तू विकून इम्रान खान यांनी 36 मिलियन्स कमावले; पाकिस्तानची जगात नाचक्की
Imran Khan News : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना आज इस्लामाबादमध्ये अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेनंतर पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे.
पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफचे (पीटीआय) अध्यक्ष आणि पाकिस्तानचे माजी पीएम इमरान खान यांना इस्लामाबाद हायकोर्टाच्या बाहेर अटक करण्यात आली आहे. अनेक प्रकरणांमध्ये त्यांच्यावर झालेल्या गुन्ह्यांमध्ये जामीन मिळावा, यासाठी ते कोर्टात गेले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, इम्रान खान यांना भ्रष्टाचार प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेनंतर समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. पीटीआयने इम्रान खान यांच्या अटकेचा निषेध केला आहे. तोशाखाना प्रकरणात इम्रान खान यांनी पाकिस्तानची नाचक्की केली होती.
इम्रान खान यांच्यावर पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळातील भ्रष्टाचारासह देशभरात अनेक खटले सुरू आहेत. इस्लामाबाद पोलिसांनी मंगळवारी इम्रान खान यांना अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात अटक केल्याची माहिती दिली.
अल-कादिर ट्रस्ट केस इम्रान खान, त्यांची पत्नी बुशरा बीबी आणि त्यांच्या पीटीआय पक्षाच्या इतर नेत्यांवर अल-कादिर विद्यापीठाच्या स्थापनेसंदर्भातील आरोपांशी संबंधित आहे. हे प्रकरण त्यांचे सरकार आणि प्रॉपर्टी टायकून यांच्यातील कथित समझोत्याशी संबंधित आहे. त्यामुळे पाकिस्ताच्या अर्थव्यवस्थेला 50 अब्ज रुपयांचे नुकसान झाले.
काय आहे तोशाखाना प्रकरण?
इम्रान खान 2018 मध्ये पंतप्रधान झाले होते. तेव्हा त्यांनी अरब देशांमध्ये प्रवास केला. त्यावेळी तिथल्या शासकांकडून इम्रान खान यांना महागड्या भेटवस्तू मिळाल्या होत्या. पाकिस्तानच्या नियमानुसार, दुसऱ्या देशांकडून मिळालेल्या जास्त किमतीच्या भेटवस्तू तोशाखानात (Toshakhana Case) ठेवाव्या लागतात.
पाकिस्तानी माध्यमांनी इम्रान खान यांनी आखाती देशातून भेट म्हणून मिळालेल्या किमती घड्याळांची विक्री केल्याचं वृत्त दिलं होतं. यातून इम्रान खान यांनी 36 मिलियन रुपये कमावल्याचा आरोपही झाला. तेव्हा इम्रान खान यांना या पूर्ण प्रक्रियेसाठी सरकारनं कायद्यानं परवानगी दिल्याचं म्हटलं होतं.
दोन प्रकरणांमध्ये अजामीनपात्र वॉरंट
इम्रान खान यांच्याविरूद्ध आत्तापर्यंत दोन प्रकरणी अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलेलं आहे. यामध्ये तोशाखाना प्रकरणात कोर्टात हजर न राहिल्याचं प्रकरण आणि दुसरं 20 ऑगस्ट 2022 रोजी एका जाहीर सभेला संबोधित करताना महिला न्यायाधीशाला धमकावल्याबद्दल खान यांच्याविरोधात अटक वॉरंट काढण्यात आलं होतं. आज अखेर कोर्टाच्या परिसरात त्यांना अटक करण्यात आलीय.