पाकिस्तानी गाढवांना चीनमध्ये "अच्छे दिन' 

वृत्तसंस्था
सोमवार, 4 फेब्रुवारी 2019

इस्लामाबाद - कदाचित अनेकांना माहीत नसेल, की जगात गाढवांच्या संख्येत पाकिस्तान आघाडीवर आहे. सर्वाधिक गाढवांची संख्या असलेल्या देशांमध्ये पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान आता चीनला गाढवांची निर्यात करणार आहे. पाकिस्तानातील स्थानिक माध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे. 

इस्लामाबाद - कदाचित अनेकांना माहीत नसेल, की जगात गाढवांच्या संख्येत पाकिस्तान आघाडीवर आहे. सर्वाधिक गाढवांची संख्या असलेल्या देशांमध्ये पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान आता चीनला गाढवांची निर्यात करणार आहे. पाकिस्तानातील स्थानिक माध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे. 

चीनमध्ये गाढवांना चांगली मागणी आहे. त्यामुळे चीनला गाढवांची निर्यात करून या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नफा कमावण्याचा पाकिस्तान सरकारचा विचार आहे. चीनमधील पारंपरिक औषधांच्या निर्मितीमध्ये गाढवाच्या कातडीचा वापर केला जातो. त्यामुळे चीनमध्ये गाढवांना चांगली किंमत मिळते. गाढवांच्या कातड्यापासून तयार करण्यात आलेल्या जिलेटिनमध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याचे चीनमध्ये मानले जाते. रक्ताचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठीच्या पारंपरिक चिनी औषधांमध्ये त्याचा उपयोग केला जातो. 

गाढवांच्या संख्येत पाक तिसरा 
जगात चीनमध्ये गाढवांची संख्या सर्वाधिक आहे, तर पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानातील गाढवांची संख्या सुमारे 50 लाख एवढी आहे. त्यामुळे चीनमधील कंपन्यांना पाकिस्तानात गाढव पालन करण्यात रुची असून, त्यासाठी मोठी गुंतवणूक करण्याचीही त्यांची तयारी आहे, अशी माहिती खैबर पख्तुंख्वा प्रांतातील वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिली. गाढव पालनाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला असून, त्यांच्या निर्यातीतून मोठ्या प्रमाणात फायदा मिळू शकतो, असा सरकारला विश्वास आहे. पहिल्या तीन वर्षांत चीनला सुमारे 80 हजार गाढवांची निर्यात करण्याचे उद्दिष्ट सरकारने निश्‍चित केले असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan has become the third largest country in donkey population