Imran Khan : इम्रान यांना आठ जूनपर्यंत हंगामी जामीन मंजूर pakistan imran khan temporary bail sanction for 8th june | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Imran Khan

Imran Khan : इम्रान यांना आठ जूनपर्यंत हंगामी जामीन मंजूर

इस्लामाबाद - माजी पंतप्रधान इम्रान खान यांना आज अनेक खटल्याप्रकरणी येथील दहशतवादविरोधी न्यायालयाने ८ जूनपर्यंत हंगामी जामीन मंजूर केला. तसेच इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबी यांना अल कादीर भ्रष्टाचार खटल्याप्रकरणी राष्ट्रीय जबाबदारी विभागाने (एनएबी) पाच लाखाच्या सिक्यूरिटी बाँडवर ३१ मे पर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

माजी पंतप्रधान इम्रान खान यांना आठ खटल्याप्रकरणी जामीन मंजूर केला असून या खटल्यात मार्च महिन्यातील न्यायालयाच्या परिसरात उसळलेल्या हिंसाचार प्रकरणाचा देखील समावेश आहे. सत्तेतून पायउतार झाल्यानंतर इम्रान खान यांच्यावर देशभरात दीडशेहून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. अल कादीर विद्यापीठाची जमीन कागदपत्रात फेरफार करून हडपल्याचा आरोप इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांच्यावर आहे. मात्र इम्रान खान यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असून आपण आणि आपली पत्नीने कोणतेही गैरकृत्य केले नसल्याचा दावा केला आहे.

तत्पूर्वी रविवारी इम्रान खान यांनी एका मुलाखतीत इस्लामाबाद येथे न्यायालयासमोर हजर होणार असल्याचे सांगितले होते. त्याचवेळी मला अटक होण्याची ८० टक्के शक्यता असल्याचेही म्हटले होते. देशात आता कायद्याचे राज्य राहिलेले नाही. पाकिस्तान जंगलराजकडे वळत असल्याचा आरोप केला. यावेळी इम्रान यांनी मला अटक झाल्यास समर्थकांनी शांत राहावे, असे आवाहन केले. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी इम्रान खान रावळपिंडी येथील नॅबसमोर हजर झाले. चार तासांच्या चौकशीनंतर त्यांना जामीन देण्यात आला.

टॅग्स :PakistanPM Imran Khanbail