भारतामुळेच अमेरिकेचा मदत बंद करण्याचा निर्णय: पाकचे आकांडतांडव

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

अमेरिका व भारत या दोन देशांची पाकिस्तानविरोधात अभद्र युती झाली आहे. अमेरिकेकडून आता भारताचीच भाषा बोलण्यात येत आहे. भारत व अमेरिका या दोन देशांना त्यांचे हितसंबंध एकच असल्याची जाणीव झाली आहे

नवी दिल्ली - अमेरिकेकडून अब्जावधी डॉलर्सची मदत बंद करण्यात आल्यामुळे संतप्त झालेल्या पाकिस्तानकडून आता आकांडतांडव करण्यात आले आहे. अमेरिकेने हे पाऊल भारतामुळेच उचलल्याची आगपाखडही पाकिस्तानकडून करण्यात आली आहे.

"अमेरिका व भारत या दोन देशांची पाकिस्तानविरोधात अभद्र युती झाली आहे. अमेरिकेकडून आता भारताचीच भाषा बोलण्यात येत आहे. भारत व अमेरिका या दोन देशांना त्यांचे हितसंबंध एकच असल्याची जाणीव झाली आहे,''अशी टीका पाकिस्तानचे संतप्त परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केली आहे.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेकडून पाकिस्तानला दिली जाणारी लष्करी मदत रोखण्यात आली. त्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानला वेळोवेळी याबाबत इशारा दिला होता. तरीदेखील पाकिस्तान अमेरिकेच्या दबावाला न जुमानता कारवाई सुरुच ठेवली. त्यानंतर आता अमेरिकेने पाकिस्तानला दिली जाणारी कोट्यवधींची सुरक्षा सहाय्य मदत रोखली आहे. तसेच पाकिस्तान दहशतवादी संघटनांविरोधात ठोस कारवाई करत नाही, तोवर आम्ही पाकिस्तानला दिली जाणारी सुरक्षा सहाय्य मदत रोखत आहोत, असे अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हिथर नोर्ट यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistan india usa