पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांची 'ट्विटथट्टा'! 

वृत्तसंस्था
सोमवार, 26 डिसेंबर 2016

न्यूयॉर्क : पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा महंमद आसिफ यांनी एका खोट्या वृत्ताच्या आधारे इस्राईलला ट्विटरवरून अणुयुद्धाची धमकी दिली. त्यानंतर मात्र आसिफ यांची नेटकऱ्यांनी यथेच्छ थट्टा उडविली. ख्रिसमसच्या सुटीच्या दिवशी पाकिस्तानी संरक्षणमंत्र्यांची 'ट्विटथट्टा' मात्र चर्चेचा विषय ठरली. 

न्यूयॉर्क : पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा महंमद आसिफ यांनी एका खोट्या वृत्ताच्या आधारे इस्राईलला ट्विटरवरून अणुयुद्धाची धमकी दिली. त्यानंतर मात्र आसिफ यांची नेटकऱ्यांनी यथेच्छ थट्टा उडविली. ख्रिसमसच्या सुटीच्या दिवशी पाकिस्तानी संरक्षणमंत्र्यांची 'ट्विटथट्टा' मात्र चर्चेचा विषय ठरली. 

ट्विटरवरील एका पोस्टनुसार इस्राईलच्या संरक्षणमंत्र्यांनी सीरियामध्ये 'इसिस'विरोधात पाकिस्तानच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत ''अणुहल्ला' करण्याचा धमकी दिल्याचे खोटे वृत्त पसरविण्यात आले. त्यानंतर पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तानजवळ असणाऱ्या अण्वस्त्रांचा वापर करण्याची धमकीच दिली. इतकेच नव्हे तर आसिफ यांचे ट्विट चारशे वेळा पोस्ट करण्यात आले. आसिफ यांच्या 'ट्विटचुकी'नंतर ट्विटरवर हजारो नेटकऱ्यांसाठी आसिफ चेष्टेचा विषय बनले. अनेकांनी त्यांच्या विरोधात मजेशीर ट्विट करत धम्माल उडवून दिली. 

एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार आसिफ एडब्ल्यूडीन्यूज.कॉम वर प्रकाशित झालेल्या एका खोट्या बातमीवर आपले मत प्रकट करत होते. 'कोणत्याही आमिषाने पाकिस्तान सीरियामध्ये लष्कर घेऊन जाणार असेल, तर अणुहल्ला करून या देशाला उद्‌ध्वस्त केले जाईल : इस्राईलचे संरक्षणमंत्री' असे संबंधित खोट्या वृत्ताचे शीर्षक होते. 20 डिसेंबर रोजी प्रकाशित झालेल्या या वृत्तामध्ये इस्राईलच्या संरक्षणमंत्र्यांचे नावही चुकीचे दिले होते. इस्राईलचे माजी संरक्षणमंत्री मोशो यालोन यांचे नाव देण्यात आले होते, तर एविगदोर लिबरमॅन इस्राईलचे सध्याचे संरक्षणमंत्री आहेत. लिबरमॅन यांनी ट्विटरवरून या वृत्ताला फेटाळून लावले. 

इस्राईलच्या संरक्षणमंत्र्यांनी सीरियातील इसिसविरोधातील पाकिस्तानच्या भूमिकेवर टीका करत अणुहल्ल्याची धमकी दिली. इस्राईल हे विसरतोय, की पाकिस्तानही अण्वस्त्रसंपन्न देश आहे. 
- ख्वाजा महंमद आसिफ, संरक्षणमंत्री, पाकिस्तान

Web Title: Pakistan makes nuclear threat to Israel, in response to fake news