नवाझ शरीफ यांच्या भावाची तुरुंगात रवानगी

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 20 October 2020

पंतप्रधान इम्रान खान आणि उत्तरदायित्व आयोग यांच्यात अभद्र युती झाली असून विरोधी नेत्यांचा राजकीय बळी घेतला जात आहे, असा आरोप शाहबाझ यांनी केला.

लाहोर- पाकिस्तान मुस्लीम लिग-नवाझ पक्षाचे प्रमुख तसेच संसदेतील विरोधी पक्षनेते शाहबाझ शरीफ यांची मनी लाँडरिंग प्रकरणी मंगळवारी तुरुंगात रवानगी करण्यात आली. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे ते लहान भाऊ आहेत. राष्ट्रीय उत्तरदायित्व आयोगाने 28 सप्टेंबर रोजी त्यांना अटक केली होती. सातशे कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंगप्रकरणी त्यांचा जामीन फेटाळण्यात आला होता. 69 वर्षीय शाहबाझ यांना त्यानंतर प्रत्यक्ष कोठडी ठोठावण्यात आली होती. ती वाढविण्याचा अर्ज लाहोरमधील उत्तरदायित्व न्यायालयाने फेटाळून लावला.

पंतप्रधान इम्रान खान आणि उत्तरदायित्व आयोग यांच्यात अभद्र युती झाली असून विरोधी नेत्यांचा राजकीय बळी घेतला जात आहे, असा आरोप शाहबाझ यांनी केला. तीन आठवड्यांच्या कालावधीत कोठडीत असताना उत्तरदायित्व आयोगाच्या अधिकाऱ्यांनी एकही प्रश्न विचारला नाही, असे शाहबाझ यांनी न्यायालयात सांगितले. नवाझ यांचे जावई मोहम्मद सफदर यांच्या अटकेचा त्यांनी निषेध केला.
  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistan news nawaj sharif brother in jail