पंतप्रधानपद अब्बासी यांच्याकडेच राहणार?

वृत्तसंस्था
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

फेरविचारासाठी नवाज यांनी घेतली बैठक; आगामी निवडणुकीचे कारण

लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी त्यांचे बंधू शाहबाज शरीफ यांना पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्रिपदावरच कायम ठेवण्याचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे हंगामी पंतप्रधान म्हणून नुकताच कार्यभार हाती घेतलेले शाहीद खाकन अब्बासी हे सरकारचा उर्वरित दहा महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत पदावर राहतील, असा अंदाज व्यक्त होत आहे.

पनामा पेपर्स गैरव्यवहारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नवाज शरीफ यांना राजीनामा देण्यास भाग पाडल्याने सत्ताधारी पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज गट) या पक्षाने पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री शाहबाज शरीफ यांचे नाव पंतप्रधानपदासाठी जाहीर केले होते. ते संसदेवर निवडून येईपर्यंत 45 दिवसांसाठी अब्बासी यांना पंतप्रधान म्हणून उभे करण्यात आले आहे. हे नियोजन झाले असतानाही आज नवाज शरीफ यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची तातडीची बैठक घेतली आणि या नियोजनाचा फेरविचार केला, असे पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले. पंजाब प्रांत हा पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शाहबाज यांच्याऐवजी इतर कोणाकडेही सूत्रे दिल्यास पक्षाला तोटा होईल, त्यामुळे अब्बासी यांनाच उर्वरित दहा महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण करू द्यावा आणि शाहबाज यांना मुख्यमंत्रिपदी कायम ठेवावे, अशी सूचना पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांनी नवाज शरीफ यांना केली आहे. त्यामुळेच त्यांनी आज बैठकीत आपल्या निर्णयाचा आढावा घेतल्याचे संबंधित नेत्याने सांगितले.

कौटुंबिक वादाचेही कारण
पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्रिपदी आपल्या जागी मुलगा हमजा याला नेमावे, ही शाहबाज यांची मागणी नवाज यांनी फेटाळून लावल्यामुळे शाहबाज यांनी आहे ते पद सोडण्यास नकार दिल्याचेही सूत्रांकडून समजते. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री अशी दोन्ही पदे कुटुंबातच राहावीत, अशी शाहबाज यांची इच्छा आहे. मात्र, नवाज यांची कन्या मरियम यांना मात्र मुख्यमंत्रिपदावर हमजा नको आहेत. तसेच, नवाज यांच्या निकट असलेल्या नेत्यांनाही शाहबाज केंद्रामध्ये नको आहेत. या सर्व घटनांमुळे अब्बासी हेच पुढील दहा महिने पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावर राहण्याची दाट शक्‍यता आहे.

Web Title: pakistan news nawaz sharif and brother shahbaz sharif