पनामा पेपरप्रकरणी शरीफांची कन्या, जावई यांना जामीन

वृत्तसंस्था
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची कन्या मरियम नवाज यांना पनामा पेपरप्रकरणी आज जामीन मिळाला. तसेच लंडनहून इस्लामाबादला पोचल्यानंतर मरियम यांचे पती कॅप्टन (निवृत्त) मोहंमद सफदर यांना अटक करण्यात आली. मात्र नंतर न्यायालयात हजर केल्यानंतर सफदर यांनाही जामीन मिळाला.

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची कन्या मरियम नवाज यांना पनामा पेपरप्रकरणी आज जामीन मिळाला. तसेच लंडनहून इस्लामाबादला पोचल्यानंतर मरियम यांचे पती कॅप्टन (निवृत्त) मोहंमद सफदर यांना अटक करण्यात आली. मात्र नंतर न्यायालयात हजर केल्यानंतर सफदर यांनाही जामीन मिळाला.

नॅशनल अकाउंटबिलिटी ब्यूरो (एनएबी) न्यायालयात हजर होण्यासाठी शरीफ यांची कन्या मरियम आणि त्यांचे पती कॅप्टन (माजी) मोहंमद सफदर हे काल रात्रीच मायदेशी परतले होते. दिर्घकाळापासून सुरू असलेल्या गैरव्यवहारप्रकरणी सफदर यांच्याविरद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले होते. येथे पोहचताच त्यांना विमानतळावर अटक करण्यात आली. मरियम आणि सफदर हे दोघेही वेगवेगळ्या वेळेत नॅशनल अकाउंटबिलिटी ब्यूरोच्या न्यायालयात हजर झाले. या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मरियम म्हणाल्या की, अगोदरच शिक्षा झाल्यानंतरही आपल्या कुटुंबावर खटला सुरू करण्यात आला आहे. हा तपास निकाल लागेपर्यंत सुरूच ठेवणार असून, जोपर्यंत हाती काही लागत नाही आणि त्यात वडील नवाज शरीफ आणि कुटुंबातील सदस्यापैकी कोणी पकडला जाणार नाही, तोपर्यंत तपास चालू राहील, अशी टीका मरियम यांनी केली. शरीफ कुटुंबावरील आरोप खोटे असून त्याबाबत कोणतेच उत्तर आपल्याकडे नसल्याचे मरियम यांना दावा केला. बंधू हसन आणि हुसेन नवाज हे न्यायालयात हजर होण्यासंदर्भात तेच निर्णय घेतील आणि ते परदेशात राहत असल्याने पाकिस्तानचा कायदा त्यांच्यावर लागू होत नाही, असे मरियम यांनी स्पष्ट केले. "डॉन न्यूज'ने दिलेल्या वृत्तानुसार, न्यायालयात नवाज शरीफ यांच्या अर्जावर सुनावणी झाली. यात हजर राहण्यासंदर्भात सवलत मिळण्याची मागणी केली आहे. कारण ते आपल्या आजारी पत्नीची कुलसूम नवाज यांची देखभाल करण्यासाठी लंडनमध्ये आहेत. नॅशनल अकाउंटबिलिटी ब्यूरो (एनएबी) न्यायालयाचे न्यायाधीश मोहंमद बशीर यांनी माजी पंतप्रधानांच्या अर्जावर तूर्त निर्णय राखून ठेवला आहे. गेल्या सुनावणीदरम्यान गैरहजर राहणाऱ्या शरीफ यांची मुले आणि कॅप्टन सफदर यांच्याविरुद्ध न्यायालयाने वॉरंट बजावले होते.

Web Title: pakistan news panama papers and nawaz sharif