'जेआयटी'चा अहवाल शरीफ कुटुंबीयांनी फेटाळला

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 जुलै 2017

"जेआयटी'चा अहवाल अस्वीकार्य आहे. त्यातील प्रत्येक विसंगतीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाणार असून, तो न्यायालयाकडूनही फेटाळला जाईल. सरकारी तिजोरीतील एकाही पैशाचा गैरवापर झालेला नाही.
- मरियम शरीफ नवाज

सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार

इस्लामाबाद: "पनामा पेपर्स'प्रकरणी संयुक्त चौकशी पथकाने (जेआयटी) सादर केलेला अहवाल आज नवाज शरीफ यांच्या कुटुंबीयांनी फेटाळून लावला. हा अहवाल म्हणजे कचरा असून, त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ व त्यांच्या कुटुंबीयांकडे उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असल्याचा ठपका ठेवण्यात आल्यानंतर याच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या पथकाने काल (ता. 10) याबाबतचा अंतिम अहवाल न्यायालयात सुपूर्त केला. या प्रकरणी शरीफ यांच्यासह त्यांची मुले हसन, हुसेन आणि मुलगी मरियम यांच्याविरुद्ध "एएनबी' अध्यादेश 1999 अंतर्गत भ्रष्टाचाराचा खटला दाखल करावा, अशी शिफारस जेआयटीने या अहवालाद्वारे केली आहे.

हा अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आला नसला, तरी त्याची लीक झालेली काही पाने सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, विरोधी पक्षनेते इम्रान खान यांनी या प्रकरणी नवाज शरीफ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर शरीफ यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची पाठराखण करताना हे शरीफ यांच्याविरोधातील षडयंत्र असल्याचे म्हटले आहे.

शेअर बाजारावर पडसाद
पनामा प्रकरणात नवाज शरीफ यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांना पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावे लागणार, या शक्‍यतेने पाकिस्तानी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी हाय खाल्ली आहे. याबाबतचा अहवाल सादर झाल्यानंतर आज सकाळी बाजारात घसरण झाल्याचे निदर्शनास आले.

Web Title: pakistan news panama papers and nawaz sharif court