भारतीय पाहुण्यांचा पाकिस्तानकडून अवमान

पीटीआय
सोमवार, 3 जून 2019

भारतीय उच्चायुक्तालयाने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीस आलेल्या अन्य देशांचे बडे अधिकारी आणि पाहुण्यांचा पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी जाणीवपूर्वक अवमान केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

इस्लामाबाद : येथील एका हॉटेलमध्ये भारतीय उच्चायुक्तालयाने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीस आलेल्या अन्य देशांचे बडे अधिकारी आणि पाहुण्यांचा पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी जाणीवपूर्वक अवमान केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शनिवारी रात्री ही घटना घडल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

सुरक्षेचे कारण देत या हॉटेलभोवती कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, या वेळी तैनात अधिकाऱ्यांनी तपासणीच्या नावाखाली पाहुण्यांशी गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. येथील सेरेना हॉटेलमध्ये भारताचे उच्चायुक्त अजय बिसारिया यांनी या इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. पाकिस्तानभरातून पाहुण्यांना यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. या पार्टीसाठी केवळ ओळखपत्रे असणाऱ्यांनाच हॉटेलात सोडले जात होते, तसेच त्यांचीही कसून चौकशी केली जात होती. त्यांना त्यांच्या वास्तव्याबाबत आणि व्यवसायाशी निगडित प्रश्‍न विचारून भंडावून सोडले जात होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. 

प्रसिद्ध पत्रकार मेहरीन झारा-लिक यांनी या संदर्भात ट्विट करून सुरक्षा दलांकडून कशा प्रकारे छळ करण्यात आला, याची माहिती ट्विटरवरून दिली. अन्य एका पत्रकाराने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, केवळ चौकशीपोटी आपण या इफ्तार पार्टीला जाणे टाळले. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे ज्येष्ठ नेते फराजुल्लाह बाबर यांनीही येणाऱ्या पाहुण्यांना चुकीच्या हॉटेल लॉबीच्या दिशेने पाठविले जात होते, अशी तक्रार केली आहे. सुरवातीला या सुरक्षा दलांनी इफ्तार पार्टीच रद्द झाल्याची चुकीची माहिती बाबर यांना दिली होती; पण त्यांनी फारच आग्रह केल्यानंतर त्यांना हॉटेलच्या बंद दाराच्या दिशेने पाठविण्यात आले. 
 
बिसारियांनी माफी मागितली 
पाहुण्यांच्या अवमानाबद्दल पाकिस्तानातील भारताचे उच्चायुक्त अजय बिसारिया यांनी सर्वांची माफी मागितली आहे, लोकांना केवळ भीती घालण्यासाठी आखण्यात आलेली ही रणनीती आम्हाला निराश करणारी असून, याचा उभय देशांतील द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan officials insults in Iftar party of Indian High Commision