पाकचा रडीचा डाव: न्यायालयाचा निकाल नाकारला

पीटीआय
शुक्रवार, 19 मे 2017

राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्‍नी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा हस्तक्षेप आणि त्यांची कार्यकक्षा आम्ही मान्य करत नाही. हे प्रकरण आंतरराष्ट्रीय पातळीवर नेत भारत आपला खरा चेहरा लपवू पाहत आहे. जाधव यांच्याविरोधात सबळ पुरावे न्यायालयात सादर करू

इस्लामाबाद - कुलभूषण जाधवप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर जगासमोर नाचक्की झालेल्या पाकिस्तानने हा निकाल मान्य करण्यास नकार दिला आहे. राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्याने हा हस्तक्षेप मंजूर नसल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने आज भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव (वय 46) यांना पाकिस्तानमधील लष्करी न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली. यानंतर लगेचच पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नफीस झकेरिया यांनी हा निकाल अमान्य असल्याचे जाहीर केले. झकेरिया म्हणाले, ""राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्‍नी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा हस्तक्षेप आणि त्यांची कार्यकक्षा आम्ही मान्य करत नाही. हे प्रकरण आंतरराष्ट्रीय पातळीवर नेत भारत आपला खरा चेहरा लपवू पाहत आहे. जाधव यांच्याविरोधात सबळ पुरावे न्यायालयात सादर करू,' असा आरोपही त्यांनी केला आहे. जाधव यांनी पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवाया केल्याची कबुली दिली असल्याने भारताला जगासमोर उघड पाडू, अशी वल्गना झकेरिया यांनी केली. मानवतेच्या मुद्दा उपस्थित करत भारताने जाधव यांच्या दहशतवादी कारवायांपासून जगाचे लक्ष भरकटवले, असा दावाही त्यांनी केला. निकाल अमान्य असल्याची पाकिस्तान सरकारची भूमिका आंतरराष्ट्रीय न्यायालयाला कळविली असल्याची माहिती झकेरिया यांनी दिली.

न्यायक्षेत्राच्या मुद्यावर भारताची याचिका फेटाळून लावली जाईल, अशी पाकिस्तानला आशा होती. मात्र न्यायाधीशांनी सुरवातीलाच आपला अधिकार स्पष्ट करत पाकिस्तानविरोधी निकाल दिल्याने सरकारला धक्का बसल्याचे झकेरीया यांच्या प्रतिक्रियेवरून दिसून येत होते. येथील माध्यमांनीही कमकुवत वकिलांनी दिशाहीन मांडणी केल्याने पराभव झाल्याचे सांगत पाकिस्तान सरकारवर टीकेची झोड उठविली आहे.

Web Title: Pakistan opposes ICJ verdict