Video : दिवाळखोर पाकिस्तानवर पाहा काय आली वेळ; इम्रान खान यांचा मोठा निर्णय

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

पाकिस्तानचे पंतप्रधान खान यांनी खैबर पख्तुन वा प्रांतातील सरकारच्या मालकीची सर्व शासकीय निवासस्थाने सार्वजनिकरित्या खुली केली आहेत.

इस्लामाबाद : सध्या पाकिस्तान अभूतपूर्व अशा आर्थिक मंदीत सापडला आहे. एकीकडे भारताने जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे. तर दुसरीकडे अर्थव्यवस्थेला भीकेचे डोहाळे लागले असल्याने 'ना घर का ना घाट का' अशी पाकिस्तानची स्थिती झाली आहे.

सध्या दिवाळखोरीत असलेल्या पाकिस्तानवर आजवरचे सर्वात मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे पंतप्रधान इम्रान खान यांनी आता शासकीय निवासस्थानांची दारे जनतेसाठी खुली केली आहेत. देशातील तसेच जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी खान यांनी हा निर्णय घेतला आहे. याद्वारे परकीय चलन पाकिस्तानला मिळू शकते. ज्यामुळे डबघाईत चाललेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला थोडाफार आधार मिळेल, असा विश्वास पंतप्रधान खान यांना वाटत आहे.  

पाकिस्तानचे पंतप्रधान खान यांनी खैबर पख्तुन वा प्रांतातील सरकारच्या मालकीची सर्व शासकीय निवासस्थाने सार्वजनिकरित्या खुली केली आहेत. याबाबतचा एक व्हिडीओ खुद्द पंतप्रधान खान यांनीच आपल्या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट केला आहे. खैबर पख्तुन वा येथील 1923 साली बांधण्यात आलेल्या एका गेस्ट हाऊसवर आधारित हा व्हिडीओ आहे. समुद्रसपाटीपासून 7922 फूट उंचीवर हे शासकीय निवासस्थान उभारण्यात आले आहे. निसर्गाच्या कुशीत असलेले हे राज्यपालांचे निवास यापुढे पर्यटकांसाठी खुले राहणार आहे. महत्त्वाचे म्हणजे पंचतारांकित हॉटेलमध्ये ज्या काही सोयीसुविधा मिळतात, त्या सर्व या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. 'वर्षाकाठी कोट्यवधी डॉलर्स खर्च करण्यासाठी वसाहतवाद्यांनी या इमारती उभारल्या. त्या आता सरकारच्या उत्पन्नाचे स्रोत बनतील,' असे कॅप्शन पंतप्रधान खान यांनी या व्हिडिओला दिले आहे. 

देशातील पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने सरकारने हे पहिले पाऊल उचलले आहे, असे म्हटले जात असले तरी खरी परिस्थिती वेगळीच आहे. देशातील महत्त्वाची अशी सरकारी निवासस्थाने, राज्यपालांची घरे, विश्रामगृहे पर्यटकांना भाडे तत्त्वावर देण्यात येणार असून त्यातून मिळणारा निधी सरकारी तिजोरीत भरणा केला जाणार आहे. त्यामुळे सर्वांना परवडतील अशा माफक दरात ही सर्व शासकीय निवासस्थाने पाक सरकारने उपलब्ध करून दिली आहेत. नाथियागली, स्वात, कलाम, बेहराईन, चित्राल तसेच सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ अशी ओळख असणाऱ्या नारान आणि कागन या ठिकाणची निवासस्थानेही पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत. 

पंतप्रधान इम्रान खान यांनी कलम 370 हा विषय प्रतिष्ठेचा बनवत आंतरराष्ट्रीय न्यायालयापर्यंत मजल मारली. मात्र, सगळीकडे त्यांच्या पदरी निराशा पडत आहे. देशात महागाईने उच्चांक गाठला असताना देखील पाकिस्तान युद्धाची भाषा करत आहे. पाकिस्तानमध्ये सध्या एक लिटर दुधाची किंमत 120 रुपये एवढी झाली आहे. त्यामुळे तेथील महागाईचा अंदाज आपल्याला येऊ शकतो.

ब्लॅक लिस्टेड पाकिस्तान
जागतिक पातळीवरील फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सने (एफएटीएफ) एशिया-पॅसिफिक समूहातून पाकिस्तानला ब्लॅक लिस्ट केल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची दखल दिवाळखोर राष्ट्र म्हणून घेतली गेली. त्यामुळे पाकिस्तान सध्या एकाकी पडला आहे. नुकतेच पाकिस्तानातील विरोधी पक्षातील महिला सदस्याने पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर जहरी टीका केली होती. त्यांनी म्हटले होते की, पाकिस्तानचे पंतप्रधान हे देशातील प्रमुख नेत्यांच्या महागड्या गाड्या विकून देशाच्या खजिन्यात भर घालणार होते. मात्र, ते स्वत: दुसऱ्याच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करत आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि सौदी अरेबियाचे राजे यांचा एक फोटो मध्यंतरी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 

कार आणि म्हशीचा लिलाव
2018 ला इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना देशाचा गाडा हाकण्यासाठी पंतप्रधान कार्यालयातील 70 आलिशान गाड्यांचा लिलाव करावा लागला होता. तसेच पंतप्रधान निवासातील म्हशींचाही त्यांनी लिलाव केला होता. सध्या पाकिस्तानवर 35 हजार अब्ज रुपयांचे कर्ज आहे. (100 भारतीय रुपये म्हणजे 220 पाकिस्तानी रुपये). वर्ल्ड बँकेसोबत पाक सरकारने 6 हजार 400 कोटी रुपयांचा करार केला होता. या करारावेळी वर्ल्ड बँकेने पाकिस्तानवर मोठ्या अटी लादल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan PM Imran Khan take big decision