लष्करी न्यायालयांना पाकमध्ये पुन्हा मान्यता

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

इस्लामाबाद: दहशतवाद्यांविरोधात वेगवान सुनावणी होऊन त्यांना शिक्षा करण्यासाठी स्थापलेल्या लष्करी न्यायालयांना पाकिस्तानमधील राजकीय पक्षांनी दोन वर्षांची मुदतवाढ देण्याचे मान्य केले आहे. पाकिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या विविध बॉंब हल्ल्यांमध्ये 125 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

पेशावरमधील शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर लष्करी न्यायालयांची स्थापना करण्यात आली होती. या न्यायालयांची मुदत दोन वर्षे ठरविण्यात आली होती. या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये न्यायालयासमोर आलेल्या 275 प्रकरणांमध्ये 161 दहशतवाद्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली, तर इतर बहुतांश जणांना तुरुंगवासाची शिक्षा मिळाली. कट्टरतावादी संघटनांकडून या न्यायालयांना सातत्याने विरोध होत असल्याने पाकिस्तान सरकारवर दबाव वाढत होता. त्यामुळे काही दिवसांपूर्वी या न्यायालयांची मुदत संपताच सरकारने कोणताही गाजावाजा न करता ही न्यायालये बंद केली होती. मात्र, गेल्या महिनाभरात पाकिस्तानात अनेक दहशतवादी हल्ले झाल्याने या न्यायालयांसाठी सरकार पुन्हा प्रयत्नशील झाले होते. त्यानुसार, सरकारने सर्व प्रमुख राजकीय पक्षांशी चर्चा करून या न्यायालयांना आणखी दोन वर्षे मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Pakistan recognized the military courts