पाकिस्तानच्या राजकारणातून नवाज शरीफांचा अस्त

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

एखादी व्यक्ती घटनेच्या कलम 62 (1) (एफ)नुसार दोषी असेल तर ती व्यक्ती आयुष्यभर दोषीच राहील. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे शरीफ आता त्यांची राजकीय वाटचाल सांभाळू शकणार नाही.     

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा पाकिस्तानच्या राजकारणातून अस्त झाला आहे. नवाझ शरीफ यांच्याविरोधात पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला. यामध्ये न्यायालयाने सांगितले, की एखादी व्यक्ती घटनेच्या कलम 62 (1) (एफ)नुसार दोषी असेल तर ती व्यक्ती आयुष्यभर दोषीच राहील. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे शरीफ यांना सक्रीय राजकारणातून पायउतार व्हावे लागणार आहे.      

Pak supreme court

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने गेल्या फेब्रुवारी महिन्यात सांगितले, की घटनेच्या अनुच्छेद 62 आणि 63 नुसार दोषी ठरविण्यात आलेली कोणतीही व्यक्ती राजकीय पक्षाचे प्रमुख पद स्वीकारु शकत नाही. न्यायालयाच्या या आदेशानंतर नवाझ शरीफ हे पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाले होते. याबाबत पाकिस्तानातील 'डॉन न्यूज'ने याबाबत माहिती दिली. त्यानुसार, पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने सर्वसंमतीने हा निर्णय दिला. मुख्य न्यायाधीश साकिब निसार यांनी निर्णयाआधी सांगितले की, देशातील सर्वसामान्यांना चांगली प्रतिमा असलेल्या नेत्यांची गरज आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी पनामा पेपर लीकप्रकरणी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने नवाझ शरीफ यांना पंतप्रधान पदावर राहण्यास अपात्र ठरविले होते. तसेच शरीफ यांच्याबरोबर पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार यांनाही अपात्र ठरवले होते. त्यानंतर आता शरीफ यांना सक्रीय राजकारणातून पायउतार व्हावे लागणार आहे.

Web Title: Pakistan Supreme Court bans ex PM Nawaz Sharif from parliament for life