पाकिस्तान दहशतवाद्यांचे नंदनवन : अमेरिकेकडून शिक्कामोर्तब

पीटीआय
गुरुवार, 20 जुलै 2017

दहशतवाद्यांचे नंदनवन असलेले देश व प्रदेश
पाकिस्तान, अफगाणिस्तान, सोमालिया, दक्षिण फिलिपिन्स, इजिप्त, इराक, लेबनॉन, लीबिया, येमेन, कोलंबिया आणि व्हेनेझुएला.

वॉशिंग्टन : पाकिस्तान देश हा दहशतवाद्यांचे नंदनवन असल्यावर अमेरिकेने आज शिक्कामोर्तब केले. दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या देशांच्या यादीत पाकिस्तानचा समावेश करण्यात आला असून, लष्करे तैयबा आणि जैशे महंमद या दहशतदवादी संघटना त्यांच्या देशातूनच कारवाया करत असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.

लष्करे तैयबा, जैशे महंमद या दहशतवादी संघटना पाकिस्तानात मुक्तपणे वावरत आहेत. दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यापासून निधी उभारणी करण्यापर्यंत सर्व गोष्टी ते पाकिस्तानातून उघडपणे करत आहेत, असे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेने "कंट्री रिपोर्ट ऑन टेररीझम' हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात दहशतवादी कारवायांना मदत करण्याऱ्या देशांची यादी तयार केली आहे. याबाबत माहिती देताना त्यांच्या परराष्ट्र खात्याने म्हटले आहे, "पाकिस्तानात कारवाया करणाऱ्या तेहरिक ए तालिबान पाकिस्तानसारख्या गटावर त्यांचे लष्कर व सुरक्षा दले कारवाई करत आहेत. मात्र अफगाण-तालिबान किंवा हक्कानी गटाविरुद्ध कोणतीही ठोस कारवाई पाकिस्तान करत नाही. त्याचा फटका अफगाणिस्तानातील शांतता प्रक्रियेला बसतो आहे.''

लष्करे तैयबा आणि जैशे महंमद यांसारख्या दहशतवादी गटांवरही पाकिस्तानने गेल्या वर्षात कोणतीही कारवाई केलेली नाही, असे या अहवालात म्हटले आहे. दुसरीकडे पाकिस्तानातील दहशतवादी संघटना आणि माओवाद्यांच्या हल्ल्यांचा वारंवार सामना भारताला करावा लागतो आहे. जम्मू-काश्‍मीरमध्ये होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांना पाकिस्तानच जबाबदार असल्याचा आरोप भारताकडून वारंवार करण्यात येतो, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

"पंजाबमधील पठाणकोटमध्ये गेल्या वर्षी जानेवारीमध्ये झालेला हल्ला हा जैशे महंमदच्या दहशतवाद्यांनी केल्याचे पुरावे भारताने सादर केले होते. तेव्हापासून दहशतवादविरोधी सहकार्य आणि त्याबाबतच्या माहितीची देवाणघेवाण यासाठी भारताने आग्रही भूमिका मांडली आहे,'' असे या अहवालात अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने म्हटले आहे.
"इसिस आणि अल कायदा या दहशतवादी संघटनांच्या भारतीय उपखंडातील कारवायांवर भारताने बारीक लक्ष ठेवले आहे. तसेच त्यांच्या धोक्‍याबद्दलची माहिती जगासमोर मांडली आहे. "इसिस'ला मदत केल्याबद्दल अनेकांना भारतात अटकही करण्यात आली आहे,'' असे अहवालात म्हटले आहे.

अहवालातील स्वतंत्र प्रकरणात अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने पाकिस्तानचा उल्लेख "दहशतवाद्यांचे नंदनवन' असा केला आहे. "हक्कानी नेटवर्क, लष्करे तैयबा, जैशे महंमद या संघटना पाकिस्तानातूनच कारवाया करतात. लष्करे तैयबावर पाकिस्तानने बंदी घातली असली, तरी जमात उद दावा, फलाह ए इन्सानियत फाउंडेशन या नावाखाली ते दहशतवादी कारवायांसाठी निधी गोळा करण्याचे काम करत आहेत. पाकिस्तानच्या राजधानीतही या संघटना कार्यरत आहेत,'' असे अहवालात म्हटले आहे. तसेच लष्करे तैयबाचा प्रमुख हाफीज सईदला संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक दहशतवादी जाहीर केले आहे. तरीही तो जाहीर सभांमधून भाषणे करताना आढळून आला होता. त्यानंतर फेब्रुवारी 2017मध्ये पाकिस्तानने त्याच्याविरुद्ध दहशतवादविरोधी विविध कलमांखाली कारवाई करून त्याच्या हालचालींवर नियंत्रण आणले,'' असे अहवालात म्हटले आहे.

परराष्ट्र खात्याने तयार केलेला हा अहवाल कॉंग्रेसपुढे मांडण्यात आला आहे. त्यात, अल कायदा, इसिस, जैशे महंमद, लष्करे तैयबा आणि डी कंपनी (दाऊद इब्राहिम) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी भारताबरोबर सहकार्य करण्याचे अमेरिकेने ठरविल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

Web Title: pakistan terrorists safe heaven USA slams