पाककडून चिनी नागरिकांच्या "बिझनेस व्हिसा'वर टाच

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 जून 2017

पाकिस्तानमध्ये दीर्घ मुदतीच्या व्हिसावर आलेल्या चिनी नागरिकांसाठीही कडक धोरण राबविण्याचा निर्णय येथील सरकारकडून घेण्यात आला आहे. व्हिसा मुदतीत वाढ करण्यासंदर्भात येथील प्रादेशिक पारपत्र कार्यालयांना असलेले अधिकार तत्काळ रद्द करण्यात आले आहेत

नवी दिल्ली - पाकिस्तानकडून चिनी नागरिकांना पाकमध्ये येण्यासाठी येणाऱ्या दिल्या जाणाऱ्या व्हिसासंदर्भातील नियमावली अधिक कडक करण्यात आल्याची घोषणा आज (गुरुवार) करण्यात आली.

पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतामध्ये सुमारे एक आठवड्यापूर्वी दोन चिनी नागरिकांची हत्या करण्यात आल्याच्या पार्श्‍वभूमीवर पाककडून उचलण्यात आलेले हे पाऊल अत्यंत संवेदनशील मानण्यात येत आहे. इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेने हा हत्याकांडाची जबाबदारी स्वीकारली होती. ठार करण्यात आलेले हे दोन्ही चिनी नागरिक हे अवैधरित्या ख्रिश्‍चन धर्माचा प्रसार करत होते, असा दावाही पाकिस्तानकडून करण्यात आला होता. या पार्श्‍वभूमीवर "बिझनेस व्हिसा'वर पाकिस्तानमध्ये येणाऱ्या चिनी नागरिकांसाठी आता अधिक कडक नियमावली राबविण्यात येणार आहे.

या नव्या नियमावलींतर्गत आता पाकिस्तानमध्ये येणाऱ्या चिनी नागरिकांना चीनमधील पाकिस्तानी दूतावासाची मान्यता असलेल्या संस्थांचे निमंत्रण पत्र बिझनेस व्हिसासाठी केल्या जाणाऱ्या अर्जास जोडावे लागणार आहे. या निमंत्रणपत्रास उद्योग व वाणिज्य मंडळांची (चेंबर ऑफ कॉमर्स) मान्यता असणेही बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय, पाकिस्तानमध्ये दीर्घ मुदतीच्या व्हिसावर आलेल्या चिनी नागरिकांसाठीही कडक धोरण राबविण्याचा निर्णय येथील सरकारकडून घेण्यात आला आहे. व्हिसा मुदतीत वाढ करण्यासंदर्भात येथील प्रादेशिक पारपत्र कार्यालयांना असलेले अधिकार तत्काळ रद्द करण्यात आले आहेत. बिझनेस व्हिसासाठीची मुदतवाढ ही आता पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबाद येथील मुख्य कार्यालयामध्येच दिली जाणार आहे.

पाकिस्तानच्या या आक्रमक, नव्या धोरणासंदर्भात आता चीनची प्रतिक्रिया पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

Web Title: Pakistan tightens business, work visas for Chinese nationals