"डोकलाम' प्रश्‍नी आता पाकिस्तान नाक खुपसणार?

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 जुलै 2017

बसित यांचा भारतामधील पाकिस्तानी राजदूत म्हणून निश्‍चित करण्यात आलेला कार्यकाळ आता संपला असून ते पुढील महिन्यात इस्लामाबाद येथे परततील, अशी अटकळ बांधण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर त्यांच्याकडून करण्यात आलेली ही "चर्चा' सूचक मानण्यात येत आहे

नवी दिल्ली - डोकलाम येथे भारतीय लष्कर व चिनी सैन्य समोरासमोर उभे ठाकल्याने दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या वादामध्ये आता पाकिस्तानकडून नाक खुपसण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पाकिस्तानचे भारतामधील राजदूत अब्दुल बसित यांनी चीनचे भारतामधील राजदूत ल्युओ त्साओहुई यांची भेट घेतली आहे. चीनचे भारताबरोबरील संबंध सध्या तणावपूर्ण असल्याच्या पार्श्‍वभूमीवर भारतामध्ये पाकिस्तानी व चिनी राजदूतांची चर्चा होणे अत्यंत संवेदनशील मानले जात आहे.

याचबरोबर, बसित यांनी या भेटीमध्ये भूतानचे भारतातील राजदूत वेस्तोप नामग्येल यांनाही भेटण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नामग्याल व बसित यांची भेट लवकरच होण्याची शक्‍यता आहे. भूतानने डोकलाममधील चिनी सैन्याच्या दादागिरीविरोधात आत्तापर्यंत भारतास पाठिंबा व्यक्त केला आहे.

बसित व चिनी राजदूताच्या भेटीमध्ये डोकलाम येथील स्थितीवर चर्चा करण्यात आली. याचसंदर्भात भूतानच्या राजदूताशीही बसित चर्चा करणार आहेत, असे सूत्रांनी म्हटले आहे. बसित यांचा भारतामधील पाकिस्तानी राजदूत म्हणून निश्‍चित करण्यात आलेला कार्यकाळ आता संपला असून ते पुढील महिन्यात इस्लामाबाद येथे परततील, अशी अटकळ बांधण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर त्यांच्याकडून करण्यात आलेली ही "चर्चा' सूचक मानण्यात येत आहे.

डोकलाम येथे चीनकडून करण्यात येत असलेले बांधकाम रोखताना भारताकडून देण्यात आलेली कारणे देऊन "भारताच्या नियंत्रणाखालील काश्‍मीर'मध्येही पाकिस्तानच्या विनंतीवरुन एखादा "तिसरा देश' हस्तक्षेप करु शकतो, असा इशारा चीनमधील कम्युनिस्ट पक्षाच्या मालकीच्या "ग्लोबल टाईम्स' या वृत्तपत्रामधून काही दिवसांपूर्वी देण्यात आला होता. या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानच्या यासंदर्भातील भूमिकेविषयी अत्यंत उत्सुकता आहे. बसित यांच्याकडून उचलण्यात येत असलेली पाऊले डोकलाम वादामध्ये नाक खुपसण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असल्याचे निदर्शक मानण्यात येत आहे.

भारत-चीनमधील तणावाचे पडसाद जागतिक राजकारणातही उमटत असून अमेरिकेकडून यासंदर्भात शांततेचे आवाहन करण्यात आले आहे. भारताने सैन्य माघारीस स्पष्ट नकार दिल्यामुळे चीनकडून तिबेट भागात सैन्याची आक्रमक हालचाल करण्यात येत आहे.

डोकलाम येथे भारतीय लष्कर व चिनी सैन्य समोरासमोर उभे ठाकल्याने निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर बोलताना परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी "भारत स्वत:च्या हिताचे संरक्षण करण्यास सक्षम' असल्याचे राज्यसभेत स्पष्ट केले आहे. 

 

Web Title: Pakistan tries to poke its nose into Doklam