पाकही योग्य वेळी उत्तर देईल - मुशर्रफ

वृत्तसंस्था
बुधवार, 21 सप्टेंबर 2016

नवी दिल्ली - कारगिल घुसखोरीचे कारस्थान रचणारे पाकिस्तानचे माजी लष्करशहा जनरल परवेझ मुशर्रफ यांनी आज, भारताने उरी हल्ल्याचा बदला घेण्याचा प्रयत्न केल्यास पाकिस्तानही "योग्य वेळी आणि ठिकाणी‘ त्याचे उत्तर देईल, अशी दर्पोक्ती केली आहे. 
 

नवी दिल्ली - कारगिल घुसखोरीचे कारस्थान रचणारे पाकिस्तानचे माजी लष्करशहा जनरल परवेझ मुशर्रफ यांनी आज, भारताने उरी हल्ल्याचा बदला घेण्याचा प्रयत्न केल्यास पाकिस्तानही "योग्य वेळी आणि ठिकाणी‘ त्याचे उत्तर देईल, अशी दर्पोक्ती केली आहे. 
 

उरी हल्ल्यानंतर भारताने तातडीने हल्ला न करण्याचा निर्णय घेत योग्य वेळी आणि ठिकाणी हल्ला करण्याचा निर्णय घेतला आहे. तेच शब्द वापरत मुशर्रफ यांनी भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, ‘भारतीय लष्कराकडून कडक प्रत्युत्तर देण्याची भाषा बोलली जात आहे. त्यांनी त्याचा परिणाम ओळखावा. तुम्ही तुमची वेळ आणि ठिकाणी निवडून हल्ला केल्यास पाकिस्तानही योग्य वेळ आणि ठिकाण पाहून हल्ला करेल. तुमच्या कारवाईनंतर आम्ही थांबणार नाही.‘‘ एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. उरी येथील हल्ल्याला जैशे महंमद जबाबदार असल्याचा दावाही त्यांनी फेटाळला. त्यांना पाकिस्तानच्या सहभागाबद्दल पुरावे मिळाल्याबाबत विचारले असता, असे पुरावे कोठूनही गोळा करता येतात, असे ते म्हणाले.
 

भारताविरोधात अशी भाषा वापरणाऱ्या मुशर्रफ यांच्यावर पाकिस्तानमध्येच देशद्रोहाचा खटला सुरू असून त्यापासून वाचण्यासाठी ते आजारपणाचे निमित्त करत कधी दुबई, तर कधी लंडनमध्ये आश्रय घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले. दोनच दिवसांपूर्वी पाकिस्तानमधील न्यायालयाने मुशर्रफ यांच्या संपत्तीवर टाच आणली आहे. 

Web Title: Pakistan will also retaliate if provoked, warns Musharraf