पाकिस्तानी वृत्तपत्राचा खोडसाळपणा; दहशतवाद्याला ठरविले 'स्वातंत्र्य सैनिक'! 

वृत्तसंस्था
रविवार, 17 फेब्रुवारी 2019

पुलवामामध्ये हल्ला झाल्यानंतर खुद्द 'जैश ए महंमद'नेच आदिल दारचा व्हिडिओ प्रसारित करून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. भारतीय यंत्रणांनीही 'जैश'च्याच सहभागाचा उल्लेख केला होता; पण 'द नेशन'ने 'जैश ए महंमद'च्या 'प्रवक्‍त्या'शी संपर्क साधून यासंदर्भात प्रतिक्रियाही घेतली आहे. 

इस्लामाबाद : काश्‍मीरमधील पुलवामा येथे पाकिस्तानच्या पाठिंब्यावर पोसलेल्या दहशतवादी संघटननेने गुरुवारी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात 'सीआरपीएफ'चे 44 जवान हुतात्मा झाले. या हल्ल्याची संपूर्ण जगभरातून निंदा होत असताना खुद्द पाकिस्तानमधील प्रसिद्धी माध्यमांनी मात्र या घटनेला 'स्वातंत्र्यसैनिकांचा हल्ला' असे स्वरूप देण्याचा ओंगळवाणा प्रयत्न केला आहे. 

'द नेशन' या पाकिस्तानमधील प्रमुख वृत्तपत्राने पहिल्या पानावर प्रसिद्ध केलेल्या बातमीमध्येच खोडसाळपणा केला आहे. यात काश्‍मीरचा उल्लेख त्यांनी 'भारतव्याप्त काश्‍मीर' असा केला आहे; तर 'जैश ए महंमद' या कट्टर दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्याचा उल्लेख 'स्वातंत्र्यसैनिक' असा केला आहे. विशेष म्हणजे, 'जैश ए महंमद'ची पाठराखण करण्याचाही प्रयत्न या वर्तमानपत्राने केला आहे. 

पुलवामामध्ये हल्ला झाल्यानंतर खुद्द 'जैश ए महंमद'नेच आदिल दारचा व्हिडिओ प्रसारित करून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. भारतीय यंत्रणांनीही 'जैश'च्याच सहभागाचा उल्लेख केला होता; पण 'द नेशन'ने 'जैश ए महंमद'च्या 'प्रवक्‍त्या'शी संपर्क साधून यासंदर्भात प्रतिक्रियाही घेतली आहे. 

'भारत काश्‍मीरमध्ये दडपशाही करत आहे आणि त्यामध्ये गेल्या तीन दशकांत 70 हजारांहून अधिक नागरिकांचा बळी गेला आहे', असा आरोपही 'द नेशन'ने केला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistans The Nation calls Terrorist Adil Dar a freedom fighter