पॅरिसमध्ये 'इसिस'चा हल्ला; पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

फ्रान्समधील राष्ट्रपतीपदाची निवडणूक जवळ आली असताना गुरुवारी रात्री दोन दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. एका दहशतवाद्याला पोलिसांनी ठार केले आहे. अन्य एकाचा शोध सुरू आहे. हल्ल्यानंतर काही वेळातच 'इसिस'ने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

पॅरिस : फ्रान्समधील राष्ट्रपतीपदाची निवडणूक जवळ आली असताना गुरुवारी रात्री दोन दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. एका दहशतवाद्याला पोलिसांनी ठार केले आहे. अन्य एकाचा शोध सुरू आहे. हल्ल्यानंतर काही वेळातच 'इसिस'ने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

सेंट्रल पॅरिसमधील एका पर्यटन स्थळाजवळ गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या आसपास एक मोटार पोलिसांनी पार्क केलेल्या वाहनाजवळ आली. त्यातून उतरलेल्या व्यक्तीने पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यामध्ये एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. तर एका दहशतवाद्याला ठार करण्यात यश मिळाले. मात्र दुसरा दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. त्यानंतर सुरक्षिततेसाठी हल्ला झालेला परिसर रिकामा करण्यात आला आणि सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली. फ्रान्स पोलिसांनी 'गुरुवारी बेल्जियममधून रेल्वेने फ्रान्समध्ये एक धोकादायक व्यक्ती दाखल झाला आहे', असा इशारा दिला आहे. गेल्या काही वर्षांपासून फ्रान्स दहशतावाद्यांच्या रडावर आहे.

Web Title: Paris shooting: 1 cop killed, Islamic State names attacker