सैनिक तीन महिलांवर बलात्कार करू शकतात

पीटीआय
सोमवार, 29 मे 2017

फिलिपिन्सच्या अध्यक्षांचे बेताल वक्तव्य

तुम्हाला मार्शल लॉचा वापर करण्याची मुभा आहे. तुम्ही या अधिकाराचा वापर करा. तुमच्यावर कारवाईची वेळ आली तर तुमच्याऐवजी मी शिक्षा भोगायला तयार आहे, असे त्यांनी सांगितले.

निला : सैनिक तीन महिलांवर बलात्कार करू शकतात, असे बेताल वक्तव्य करून फिलिपिन्सचे अध्यक्ष रॉड्रिगो ड्युटर्ट यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे. या विधानावरून त्यांच्यावर जगभरातून टीका होत आहे. ड्युटर्ट यांनी अप्रत्यक्षपणे सैनिकांना बलात्कार करण्यासाठी प्रोत्साहनच दिले असल्याची खंत महिला संघटनांनी व्यक्त केली आहे.

रॉड्रिगो ड्युटर्ट यांनी शुक्रवारी सैन्यातील जवानांशी संवाद साधला. दक्षिण फिलिपिन्समधील मारावी या शहराच्या दिशेने फिलिपिन्स सैन्याने कूच केले. सैन्याच्या जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी रॉड्रिगो ड्युटर्ट यांनी जवानांशी संवाद साधला; पण भाषणादरम्यान ड्युटर्ट यांची जीभ घसरली. तुम्हाला मार्शल लॉचा वापर करण्याची मुभा आहे. तुम्ही या अधिकाराचा वापर करा. तुमच्यावर कारवाईची वेळ आली तर तुमच्याऐवजी मी शिक्षा भोगायला तयार आहे, असे त्यांनी सांगितले. तुम्ही तीन महिलांवर बलात्कार केले तर त्याची जबाबदारी माझी असेल. मी तुमच्यासाठी तुरुंगातही जाईन, असे ड्युटर्ट यांनी म्हटले आहे.

गेल्या आठवड्यात मारावी या शहरात ड्युटर्ट यांनी 60 दिवसांसाठी मार्शल लॉ लागू केला आहे. सुमारे दोन लाख लोकसंख्या असलेल्या या शहरात इसिससमर्थक दहशतवादी संघटना सक्रिय आहे. या संघटनेच्या तळांवर फिलिपिन्स सैन्याने हवाई हल्लेही सुरू केले आहेत. मार्शल लॉच्या काळात तुम्हाला कोणत्याही घरात घुसून चौकशी करण्याचे अधिकार आहेत, असे ड्युटर्ट यांनी सांगितले. ड्युटर्ट त्यांच्या विधानावर ठाम असून, त्यांनी गमतीने असे विधान केल्याचे सांगितले जाते.

Web Title: Philippines news soldiers rape three women rodrigo