वैमानिकांचा संप; 'लुफ्तान्सा'ची उड्डाणे रद्द

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

वैमानिकांच्या संघटनेची पगारवाढीची मागणी अवाजवी आहे. इतर कंपन्यांमधील वैमानिकांना असलेल्या पगारापेक्षा ही वाढ फारच जास्त आहे. ज्या कंपनीमध्ये सर्वोत्तम पगार दिला जातो, तिथे अवाजवी वेतनवाढ करण्याची मागणी मान्य करणे शक्‍य नाही.
- 'लुफ्तान्सा'मधील मनुष्यबळ विकास विभाग

बर्लिन: वेतन आणि कामाच्या वेळांमधील सुधारणेच्या मागणीवरून वैमानिकांनी सुरू केलेले आंदोलन संपण्याची चिन्हे दिसत नसल्याने 'लुफ्तान्सा' या बड्या विमानकंपनीला आजची (गुरुवार) 912 उड्डाणे रद्द करावी लागली. यामुळे 1,15,000 प्रवाशांचा खोळंबा झाला.

'लुफ्तान्सा'मधील वैमानिकांच्या संघटनेने बुधवारी रात्री उशीरापासून संप पुकारला आहे. 2014 पासून या संघटनेने तब्बल 14 वेळा संप केला आहे. उद्याही (शुक्रवार) हा संप सुरूच राहण्याची दाट शक्‍यता आहे. 'लुफ्तान्सा'चाच एक भाग असलेल्या 'युरोविंग्ज' या विमानकंपनीतील केबिन क्रूनेही मंगळवारी संप पुकारला होता. त्यामुळे जर्मनीतील 60 हून अधिक अंतर्गत उड्डाणे रद्द करावी लागली होती.

दरवर्षी 3.66 टक्के पगारवाढ मिळावी आणि या सूत्रानुसार गेल्या पाच वर्षांमधील पगारवाढीचा फरकही मिळावा, अशी या संघटनेची प्रमुख मागणी आहे. 'लुफ्तान्सा'ने 2.5 टक्के पगारवाढ मान्य केली होती.

'लुफ्तान्सा'ला सातत्याने कर्मचारी संघटनांच्या संपाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे गेल्या जुलैमध्ये त्यांनी कर्मचारी संघटनांशी वाटाघाटी करून एक करार केला होता. यामध्ये अडीच टक्के पगारवाढ, कामाचे नियमित तास, संप न करण्याची हमी आणि 2021 पर्यंत नोकरीची हमी या बाबींचा समावेश होता.

Web Title: Pilots extend strike;Lufthansa cancels 900 flights