भारताने आगीशी खेळू नये; चीनचा इशारा

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

चीनशी राजनैतिक संबंध असलेल्या देशाने तैवानशी कुठल्याही प्रकारचा अधिकृत संपर्क प्रस्थापित करू नये, अशी चीनची भूमिका आहे. अशा प्रकारच्या कुठल्याही प्रयत्नांना चीनचा विरोध असेल. 
- गेंग शुआंग, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते

बीजिंग - तैवानाच्या संसदीय सदस्यांच्या शिष्टमंडळाच्या भारत दौऱ्याबाबत चीनने राजनैतिक मार्गाने आपला आक्षेप नोंदविला आहे. तसेच, भारत आणि चीन संबंध डोळ्यांसमोर ठेवून तैवानशी संबंधित मुद्दे दूरदर्शीपणे हाताळावेत, असा सल्लाही चीनने भारताला दिला आहे. एक प्रकारे भारताने आगीशी खेळू नये, असा सज्जड दम देण्याचा प्रयत्न चीनकडून सुरू असल्याचे दिसते. 

तैवानच्या संसद सदस्यांचे तीन सदस्यीय शिष्टमंडळ 12 फेब्रुवारी रोजी भारत दौऱ्यावर आले होते. मात्र, या घडामोडींमुळे संतापलेल्या चीनने आज या प्रकरणी भारताला इशारा देत "वन चायना पॅलिसी'ची आठवण करून दिली आहे. चीनबरोबर स्थिर आणि सुरळीत संबंध हवे असतील तर या धोरणाचे पालन करणे गरजेचे आहे, असे एक प्रकारे चीनने भारताला बजावले आहे. 

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, की तैवानच्या संसदेच्या शिष्टमंडळाच्या भारत दौऱ्याबद्दल चीनने राजनैतिक पातळीवर भारताकडे आपला आक्षेप नोंदविला आहे. तसेच, दोन्ही देशांतील संबंध स्थिर आणि सुरळीत ठेवण्यासाठी तैवानशी संबंधित मुद्दे भारताने दूरदर्शीपणे हाताळावेत, अशी चीनची अपेक्षा आहे. 

तैवानकडून भारतात कुठल्याही संस्थेच्या उभारणीस चीनचा विरोध आहे, असे शुआंग यांनी स्पष्ट केले. तैवानच्या नवी दिल्लीतील सध्याच्या कार्यालयात सुधारणा करण्याचाही तैवानचा विचार असून, त्यालाही चीनचा विरोध असल्याचे शुआंग म्हणाले. 

वन चायना पॉलिसी 
तैवान हा चीनचा अविभाज्य भाग असल्याचा चीनचा दावा आहे. त्यामुळे चीनशी परराष्ट्र संबंध असलेल्या देशाने तैवानशी कुठल्याही प्रकारे राजनैतिक संपर्क साधू नये, असे चीनचे धोरण आहे. तैवानशी चीनच्या माध्यमातूनच अधिकृत संपर्क साधला जावा, अशी चीनची अपेक्षा आहे. या धोरणालाच "वन चायना पॉलिसी' म्हणून ओळखले जाते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तैवानच्या अध्यक्षांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. त्या वेळीही चीनने त्यास स्पष्ट शब्दांत विरोध दर्शविला होता. 

चीनशी राजनैतिक संबंध असलेल्या देशाने तैवानशी कुठल्याही प्रकारचा अधिकृत संपर्क प्रस्थापित करू नये, अशी चीनची भूमिका आहे. अशा प्रकारच्या कुठल्याही प्रयत्नांना चीनचा विरोध असेल. 
- गेंग शुआंग, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते

Web Title: 'Playing With Fire': India Gets Complaint From China - And A Warning