प्लुटोला पुन्हा ग्रह बनवा!

वृत्तसंस्था
सोमवार, 19 फेब्रुवारी 2018

बुध, पृथ्वी, मंगळ, गुरु, शुक्र, शनी, युरेनस व नेपच्यूनप्रमाणे प्लुटोही पुन्हा ग्रहमालेतील प्रमुख ग्रह बनावा, असे मला वाटते. "लेट्‌स गो मीट द प्लॅनेट' नावाचा व्हिडिओ मी पाहिला. त्यात प्लुटो सर्वांत शेवटी होता. प्लुटोला कचरापेटीत फेकून दिले आहे आणि पृथ्वापासून त्याला भय वाटत आहे. कोणीही किंवा कोणताही ग्रह, लघुग्रह कचरापेटीत टाकला जाऊ शकत नाही

डब्लिन (आर्यलंड) - सूर्यमालेतील सर्वांत लहान ग्रह प्लुटो हा ग्रह नसल्याचा दावा करीत आंतरराष्ट्रीय खगोलीय लघुग्रह संघटनेने (आयएयू) 2006मध्ये त्याला लघुग्रह घोषित करून सूर्यमालेतील नऊ ग्रहांमधून त्याचे नाव काढले होते. या घटनेला 12 वर्षे उलटून गेली आहे. मात्र प्लुटोला पुन्हा ग्रहाचा दर्जा द्यावा, अशी मागणी आर्यलंडमधील एका सहा वर्षांच्या चिमुकलीने  "नासा'कडे केली आहे. कॅरा लकी ओ कॉन्नोर असे तिचे नाव आहे.

अमेरिकेची अंतराळ संघटना "नासा'ला लिहिलेल्या पत्रात कॅराने म्हटले आहे की, "मी एक गाणे ऐकले आहे. गाण्याच्या शेवटी "प्लुटोला परत आणा' अशा ओळी आहेत. असे प्रत्यक्षात झाल्यास मला आवडेल. माझ्या मागणीचा विचार करावा आणि प्लुटोला पुन्हा ग्रहाचा दर्जा द्यावा.'

"वॉशिंग्टन पोस्ट'ने दिलेल्या वृत्तानुसार कॅराने पत्रात नेपच्यूनभोवती असणाऱ्या कडे क्‍युपिअर बेल्टचा उल्लेख केला आहे, ज्यात अनेक लघुग्रहांचा समावेश आहे. "" बुध, पृथ्वी, मंगळ, गुरु, शुक्र, शनी, युरेनस व नेपच्यूनप्रमाणे प्लुटोही पुन्हा ग्रहमालेतील प्रमुख ग्रह बनावा, असे मला वाटते. "लेट्‌स गो मीट द प्लॅनेट' नावाचा व्हिडिओ मी पाहिला. त्यात प्लुटो सर्वांत शेवटी होता. प्लुटोला कचरापेटीत फेकून दिले आहे आणि पृथ्वापासून त्याला भय वाटत आहे. कोणीही किंवा कोणताही ग्रह, लघुग्रह कचरापेटीत टाकला जाऊ शकत नाही,'' असे तिने म्हटले आहे.

"नासा'कडून कॅराचे कौतुक
"नासा'ने कॅराच्या या पत्राची दखल घेतली असून या संस्थेच्या ग्रह विज्ञान विभागाचे संचालक जेम्स ग्रीन यांनी या चिमुकलीला उत्तरही पाठविले आहे. प्लुटोबद्दल कुतूहल आणि आत्मीयता दाखविल्याबद्दल त्यांनी कॅराचे कौतुक केले आहे. ""प्लुटो हा शांत ग्रह आहे हे तुझे म्हणणे मला मान्य आहे. ग्रहविश्‍व हे अतिशय आकर्षक असून सतत बदलत असते. माझ्या मते प्लुटो ग्रह आहे की लघुग्रह हे मुद्दाच नाही. प्लुटो हा कुतूहलाचा विषय असून त्याचा सतत अभ्यास करणे आवश्‍यक आहे,'' असे ग्रीन म्हणाले. ""मला विश्‍वास आहे, की तू नव्या ग्रहाचा शोध घेशील. तू शाळेत चांगला अभ्यास केला तर एक दिवस निश्‍चितच आम्ही तुला "नासा'मध्ये पाहू,'' असे कौतुकोद्‌गारही त्यांनी काढले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pluto Planet NASA Cara Lucy O'Connor