मोदींचे मित्र बेंजामीन नेतन्याहू यांचे पंतप्रधान पद धोक्यात!

कार्तिक पुजारी
Saturday, 8 August 2020

गेल्या काही आठवड्यांपासून इस्त्राईलचे नागरिक पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांच्याविरोधात रस्त्यावर उतरुन निदर्शने करत आहेत.

तेल अविव- गेल्या काही आठवड्यांपासून इस्त्राईलचे नागरिक पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांच्याविरोधात रस्त्यावर उतरुन निदर्शने करत आहेत. आंदोलनाला कोणताही नेता नाही, पण हे सर्व लोक एका उद्धेशाने एकत्र आले आहेत. बेंजामीन नेतन्याहू यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप आणि कोरोना विषाणूविरोधात लढण्यात आलेलं त्यांना अपयश या मुद्यावरुन आंदोलक त्यांचा राजीनामा मागत आहेत. त्यामुळे नेतन्याहू अडचणीत सापडल्यांचं दिसत आहे. 

इस्त्राईली न्यायालयात नेतन्याहू यांच्या विरोधात लाच, फसवणूक आणि भ्रष्टाचार या प्रकरणी खटला चालू आहे. यामुळे अनेकांनी त्यांचा राजीनाम्याची मागणी केली आहे. दुसरीकडे  इस्त्राईलमध्ये कोरोना संक्रमनाचा वेग सर्वाधिक आहे. महामारीच्या काळात छोट्या उद्योगांना वाचवण्यासाठी फारशे काही प्रयत्न करण्यात आले नसल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. नेतन्याहू कोरोना महामारी प्रादुर्भाव हाताळण्यास अपयशी ठरले आहेत. इस्त्राईलमध्ये जवळपास 15 ते 16 छोटे-मोठे पक्ष आहेत. या सर्वांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 

जुनागढ नव्या नकाशात दाखवल्यानंतर पाकिस्तानची पुढची चाल; तैनात केली लढाऊ विमाने

बेंजामीन नेतन्याहू 2009 पासून पंतप्रदानपदावर आहेत. शिवाय त्यांनी सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवलं आहे. नेतन्याहू लिकुड पक्षाचे अध्यक्ष आहेत. एप्रिल 2019 च्या निवडणुकीत कोणत्याहीत पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. त्यामुळे सप्टेंबर 2019 मध्ये पुन्हा निवडणुका घेण्यात आल्या. सेंट्रिस्ट ब्लू आणि वाईट पक्षाने नेतन्याहू यांच्या लिकुड पक्षापेक्षा किंचितशी आघाडी घेतली. असे असले तरी नेतन्याहू किंवा सेंट्रिस्ट ब्लू आणि वाईट पक्षाचे बेनी गँन्टझ यांना सरकार स्थापन करता आले नाही. नेतन्याहू यांनी त्यानंतर कट्टर विरोधक बेनी गँन्टझ यांच्या पक्षाची हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला. सेंट्रिस्ट ब्लू आणि वाईट पक्षाच्या पाठिंब्यावर नेतन्याहू यांनी 17 मे 2020 रोजी पाचव्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. मात्र, गँन्टझ यांच्यासोबत सरकार चालवताना नेतन्याहू यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. 

भ्रष्टाचाराचे आरोप आणि कोरोना महामारीला रोखण्यात आलेले अपयश यामुळे जनमत नेतन्याहू यांच्या विरोधात गेले आहे. त्यांनी पायउतार व्हावे अशी मागणी नागरीक करत आहेत. याच मागणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून आंदोलक रस्त्यावर उतरुन निदर्शने करत आहेत. मात्र, नेतन्याहू यांनी आंदोलकांना अराजकतावादी म्हटलं आहे. शिवाय लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या पंतप्रधानाला काही डाव्या विचारसरणीचे लोक खाली खेचण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काही माध्यमे डाव्या लोकांना मदत करत असल्याचंही ते म्हणाले आहेत. 

डिसेंबर 2016 मध्ये नेतन्याहू यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला होता. तेव्हापासून त्यांच्या अडचणी वाढत चालल्या असून त्यांच्या विरोधात न्यायालयात खटला सुरु आहे. मात्र, नेतन्याहू यांचा कोरोना महामारीला संधीत रुपांतरीत करण्याचा प्रयत्न आहे. कोरोना काळात न्यायालयाच्या सुनावणीपासून दूर राहण्यासाठी आणि तुरुगांत जाण्यापासून वाचण्यासाठी नेतन्याहू हालचाली करत आहेत. शिवाय नेतन्याहू यांनी नेहमी प्रभावी ठरणारं राष्ट्रवादाचं हत्यार बाहेर काढलं आहे.  इस्त्राईलमध्ये जवळपास 20 टक्के इस्त्राईली मुस्लीम नागरिक आहेत. या लोकांच्या विरोधात भूमिका घेऊन ते ज्यू धर्मियांना चुचकारण्याचं काम करत आहेत. 

घरी चिमुकल्या पावलांची चाहूल आणि वडिलांनी विमान अपघातात सोडले प्राण

नेतन्याहू यांनी नेहमीच इशारा आणि धमकी देऊन विरोधकांना गप्प करण्याची नीती अवलंबली आहे. 1995 मध्ये लिकुड पक्षाचे उद्योन्मुख नेते नेतन्याहू यांनी तत्कालीन लेबर पक्षाचे पंतप्रधान यित्झाक रिबिन यांना देशाचा शत्रू ठरवून टाकलं होतं. त्यानंतर कट्टर उजव्या विचारसरणीच्या लोकांनी रिबिन यांची हत्या केली होती. एक वर्षाच्या आतच नेतन्याहू यांनी देशाच्या प्रमुखपदी विराजमान झाले होते. सायबर धमक्या देणेही नेतन्याहू यांच्या मोहिमेचा एक भाग राहिला आहे. नेतन्याहू यांच्या खटल्याप्रकणात सहभागी असलेले  न्यायमूर्ती आणि न्यायालयीन अधिकाऱ्यांना धमक्या मिळत आहेत. त्यामुळे या खटल्यातील मुख्य फिर्यादीसाठी 24 तास सुरक्षा देण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pm Modi friend israel pm Benjamin Netanyahu post in danger