Narendra Modi Video : "वो देश है इंडिया" मोदींच्या भाषणाने सिडनी दणाणून गेली, भारताचा जयजयकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi

Narendra Modi Video : "वो देश है इंडिया" मोदींच्या भाषणाने सिडनी दणाणून गेली, भारताचा जयजयकार

सिडनीः ऑस्ट्रेलियातल्या सिडनी येथील ऑलिम्पिक पार्कमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना संबोधित केलं. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बनीज यांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी पंतप्रधांनी जगभराच्या तुलनेत भारत कुठल्या क्षेत्रांमध्ये पुढे आहे, याचा पाढा वाचला.

सिडनी येथील जाहीर कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध क्षेत्रात भारताच्या उल्लेखनीय कामगिरीवर प्रकाश टाकला. त्यांनी तंत्रज्ञानातील भारताच्या प्रगतीवर भाष्य केलं. विशेषत: एआय, माहिती तंत्रज्ञान आणि अंतराळ संशोधन या क्षेत्राविषयी भारताच्या योगदानाबद्दल माहिती दिली.

जगातील सगळ्यात मोठी यंग टॅलेंट फॅक्ट्री भारत आहे, असं असं पंतप्रधान मोदींनी ठणकावून सांगितलं. कोरोनामध्ये ज्या देशाने सगळ्यात जलद गतीने व्हॅक्सिनेशन प्रोग्रॅम चालवला तो देश भारत होता. असं म्हणून त्यांनी उपस्थितांकडून भारताच्या यशाचा उद्घोष करवून घेतला.

मोदी पुढे म्हणाले की, भारताची अर्थव्यवस्था जगामध्ये सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. स्मार्टफोन डेटा युजर असलेला जगातला एक नंबरचा देश भारत आहे. इंटरनेट युजरच्या संख्येत जगात दोन नंबरचा देश भारत आहे. याशिवाय जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल मॅन्युफॅक्चरर देश भारत असून राईस, साखरेची उत्पादनं असणारा जगातला दुसऱ्या नंबरचा देश आहे.

फ्रूट आणि भाजीपाला उत्पादनामध्ये भारत हा जगामध्ये दोन नंबरचा देश असल्याचं त्यांनी ठासून सांगितलं. शिवाय जगातला तिसरा सगळ्यात मोठा स्टार्टअप इको सिस्टिम असलेला भारत देश असून तिसरं सगळ्यात मोठं ऑटोमोबाईल मार्केट असलेलाही देश भारत असल्याचं ते म्हणाले.

सिडनीमध्ये पंतप्रधानांनी २० हजारांपेक्षा जास्त नागरिकांना संबोधित केलं. नरेंद्र मोदींच्या अगोदर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथनी अल्बनीज यांनी मोदी खरे बॉस असल्याचं म्हटलं. त्याशिवाय ते म्हणाले की, या स्टेजवर मी यापूर्वी कुणाला बघितलं असेल तर ते ब्रूस स्प्रिंग्सटीन होते. त्यांना त्यावेळी एवढं प्रेम मिळालं नव्हतं. मात्र मोदींना जे प्रेम मिळतंय ते अभूतपूर्व आहे. यावेळी संपूर्ण स्टेडियम मोदी-मोदी घोषणांनी दणाणून गेलं होतं.

ऑलिम्पिक पार्कमध्ये मोदींचं स्वागत पारंपारिक पद्धतीने केलं. तेथील स्थानिकांनी मोदींची आरतीही केली. यावेळी वैदिक मंत्रोच्चार पठण करण्यात आलं. पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात 'नमस्ते ऑस्ट्रेलिया' अशी केली.

टॅग्स :Narendra Modi