राष्ट्रपती मुखर्जींचा दौरा यशस्वी

पीटीआय
रविवार, 6 नोव्हेंबर 2016

काठमांडू - भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या नेपाळ भेटीमुळे दोन्ही देशांतील सहकार्यात वाढ झाली असून, मुखर्जी यांचा नेपाळ दौरा सर्वच अंगांनी यशस्वी ठरला असल्याचे नेपाळने म्हटले आहे. मुखर्जी यांच्या दौऱ्याबाबत नेपाळने समाधान व्यक्त करत त्याचा दोन्ही देशांतील परस्पर संबंधांवर सकारात्मक परिणाम होईल, असे म्हटले आहे. परराष्ट्रविषयक तज्ज्ञांनी मात्र हा दावा फेटाळून लावला असून, भारत-नेपाळ दरम्यानचे अलीकडील काळात बिघडलेले संबंध राष्ट्रपतींच्या एकाच दौऱ्यामुळे पूर्ववत होणार नाहीत, असे म्हटले आहे.

भारताचे राष्ट्रपती मुखर्जी यांच्या तीन दिवसांच्या नेपाळ दौऱ्याची शुक्रवारी सांगता झाली. भारताचा परंपरागत मित्र असलेल्या नेपाळने नवी राज्यघटना स्वीकारल्यानंतर त्यास मधेशींनी विरोध केला होता. मधेशी समुदायाचे भारताशी जवळचे संबंध आहेत. मधेशींच्या आंदोलनाच्या काळात नेपाळ आणि भारताच्या परस्पर संबंधांवर मोठा परिणाम झाला होता. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती मुखर्जी यांच्या नेपाळ दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले होते.

मुखर्जी यांच्या दौऱ्यानंतर शुक्रवारी नेपाळ सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही याबाबत चर्चा झाली असल्याचे सांगण्यात आले. मुखर्जी यांच्या दौऱ्यामुळे दोन्ही देशांतील परस्पर संबंध अधिक बळकट होण्यास मदत झाली असून, दोन्ही देशांच्या दरम्यानच्या सहकार्यात वाढ झाली असल्याची प्रतिक्रिया नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रकाश शरण महात यांनी आज व्यक्त केली. दोन्ही देशांच्या दरम्यान विश्वासाचे वातावरण निर्माण होण्यासाठी मुखर्जींच्या दौऱ्याने हातभार लावला असल्याचेही त्यांनी सांगितले.

तज्ज्ञांनी दावा फेटाळला
मधेशींच्या आंदोलनाच्या काळात भारत-नेपाळ संबंध पहिल्यांदाच मोठ्या स्वरूपात विस्कळित झाले होते. त्यामुळे मुखर्जी यांच्या एका दौऱ्यामुळे ते लगेच पूर्ववत होतील अशी अपेक्षा बाळगणे चुकीचे आहे, असे मत नेपाळचे माजी परराष्ट्र सचिव मधुरामन अचार्य यांनी व्यक्त केले. भारत नेपाळसोबतचे संबंध सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहे. मुखर्जी यांच्या दौऱ्याचा सकारात्मक परिणाम निश्‍चित होईल. मात्र, एका दौऱ्याकडून फार मोठ्या अपेक्षा करणे अयोग्य ठरेल, असे ते म्हणाले.

Web Title: President Mukherjee successful tour