तुर्कस्तानच्या अध्यक्षांचा खळबळजनक दावा 

पीटीआय
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

इस्तंबूल/अंकारा (पीटीआय) : सौदी अरेबियाचे प्रसिद्ध पत्रकार जमाल खाशोगी यांची हत्या नियोजनपूर्वक करण्यात आल्याचा खळबळजनक दावा तुर्कस्थानचे अध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगान यांनी केला आहे. खाशोगी यांची हत्या करण्याचा आदेश कोणी दिला? हत्येनंतर खाशोगी यांच्या मृतदेहाचे नेमके काय केले? या प्रश्नांची उत्तरे सौदीने द्यावीत, अशी मागणीही एर्दोगान यांनी केली आहे. 

इस्तंबूल/अंकारा (पीटीआय) : सौदी अरेबियाचे प्रसिद्ध पत्रकार जमाल खाशोगी यांची हत्या नियोजनपूर्वक करण्यात आल्याचा खळबळजनक दावा तुर्कस्थानचे अध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगान यांनी केला आहे. खाशोगी यांची हत्या करण्याचा आदेश कोणी दिला? हत्येनंतर खाशोगी यांच्या मृतदेहाचे नेमके काय केले? या प्रश्नांची उत्तरे सौदीने द्यावीत, अशी मागणीही एर्दोगान यांनी केली आहे. 

इस्तंबूलमधील तुर्कस्तानच्या वाणिज्य दूतावासात 2 ऑक्‍टोबर रोजी खाशोगी यांची हत्या करण्यात आली असून, त्यासाठी सौदीच्या अधिकाऱ्यांनी बरेच दिवस आधी नियोजन केले होते, असा दावा एर्दोगान यांनी केला आहे. तुर्कस्तानमधील सत्ताधारी पक्षाच्या खासदारांशी बोलताना एर्दोगान यांनी हा दावा केला. "खाशोगी यांच्या मृतदेह सध्या कोठे आहे, हे उघड करा,'' अशा शब्दांत एर्दोगान यांनी सौदीला आव्हान दिले आहे. खाशोगींच्या हत्याप्रकरणी तुर्कस्तानात खटला चालविला जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे. सौदीमध्ये गुंतवणूक परिषदेला आजपासून सुरवात झाली असून, त्या पार्श्वभूमीवर एर्दोगान यांनी सौदीवर आरोप केले आहेत. 

गुंतवणूक परिषदेवर हत्येची छाया 
दरम्यान, सौदीची राजधानी रियाधमध्ये गुंतवणूक परिषदेला युवराज प्रिन्स महंमद बिन सलमान यांच्या उपस्थित सुरवात झाली असल्याचे सांगण्यात आले. खाशोगी यांच्या हत्येनंतर सौदीचे प्रशासन आणि युवराज प्रिन्स महंमद यांच्यावर मोठ्या प्रमाणात दबाव निर्माण झाला आहे. प्रिन्स महंमद यांच्या धोरणांचे टीकाकार असलेल्या खाशोगी यांच्या हत्येचा जगभरातील नेत्यांनी निषेध केला आहे. तसेच, याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणीही जागतिक नेत्यांनी केली आहे. 

चौकशीला सहकार्य करू : सौदी 
खाशोगी यांच्या हत्याप्रकरणी सौदीने सांगितलेला घटनाक्रम गुंतागुंतीचा असून, ते जिवंत असल्याचा दावा सौदीकडून सुरवातीला करण्यात आला होता. मात्र, नंतर चौकशी दरम्यान खाशोगी यांची चुकून हत्या झाल्याची कबुली सौदीकडून देण्यात आली होती. आता याप्रकरणी आंतरराष्ट्रीय चौकशीला सहकार्य करण्याची तयारीही सौदीकडून दर्शविण्यात आली आहे. तसेच, या हत्येला जबाबदार असलेल्यांना शिक्षा दिली जाईल, असेही सौदीने म्हटले आहे. या प्रकरणी सौदीमध्ये 18 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The President of Turkey Sensation Claims