अयोध्येच्या राजकुमारीचं झालं होतं कोरियाचा राजा किम सुरोशी लग्न

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 4 August 2020

दक्षिण कोरियाचे राजदूत शिन बोंग किल यांनी अयोध्येबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. अयोध्या आणि कोरियाचं खूप जुनं असं कनेक्शन आहे. कोरियाच्या एका प्राचीन पुस्तकाचा दाखला देत त्यांनी संबंध सांगितले आहेत.

अयोध्या - सध्या देशात राम मंदिराच्या भूमीपूजनाची चर्चा जोरात सुरू आहे. बुधवारी 5 ऑगस्टला पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत अयोध्येतील राम मंदिराचे भूमीपूजन होणार आहे. दरम्यान, दक्षिण कोरियाचे राजदूत शिन बोंग किल यांनी अयोध्येबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. अयोध्या आणि कोरियाचं खूप जुनं असं कनेक्शन आहे. कोरियाच्या एका प्राचीन पुस्तकाचा दाखला देत त्यांनी संबंध सांगितले आहेत. ते म्हणाले की, पुस्तकात लिहिल्यानुसार अयोध्येतील एका राजकुमारीने कोरियातील राजा किम सुरो याच्याशी लग्न केलं होतं. राजा किमचा मकबरा जिथं होता तिथं अयोध्येशी संबंधित अनेक कलाकृती आढळल्या आहेत. किम यांच्या वंशजांनी भारताला गेल्या काही वर्षांत भेटही दिली होती.

दोन हजार वर्षांपूर्वी इसवी सन 48 मध्ये अयोध्येची राणी सुरीरत्न कोरियाला गेली होती असं सांगितलं जातं. तिथं राजकुमार किम सुरो याच्याशी लग्न झाल्यानंतर तिचं नाम हवांग ओके असं ठेवण्यात आलं. राजकुमारी सुरीरत्नच्या कोरियापर्यंतच्या प्रवासाबाबतही एक अख्यायिका सांगितली जाते. जलमार्गाने जाताना सुरीरत्नने एक दगड अयोध्येतून नेला होता. नाव स्थिर रहावी यासाठी तो दगड घेतला होता असंही म्हटलं जातं. तो दगड पगोडामध्ये स्मृती म्हणून जपून ठेवण्यात आला आहे.

काशी हिंदू विद्यापीठातील इतिहास विभागातील प्राध्यापक अतुल कुमार त्रिपाठी सांगतात की, चिनी कथांनुसार अय़ोध्येच्या राजाला एक स्वप्न पडलं होतं. त्यामध्ये त्याला असा संदेश मिळाला की, राजकुमारीचा विवाह कोरियाचा राजकुमार किम सुरो याच्याशी लावून द्यावा. दोघांनाही दिर्घायुष्य लाभलं होतं असंही सांगण्यात येतं. दोघांच्या वंशजांची संख्या जवळपास 60 लाख इतकी आहे. ही संख्या दक्षिण कोरियाच्या एकूण लोकसंख्येपैकी 8 ते 10 टक्के इतकी होते.

हे वाचा - इस्त्राईलने स्वत:भोवती तयार केलंय अदृष्य कवच; शत्रू राष्ट्राला हल्ला करणं सोपं नाही

कोरियामध्ये किम हे आडनाव असलेल्यांचे प्रमाण जास्त आहे. राजा किम सुरो यांचे लग्न सुरीरत्नशी झाल्यानंतर त्यांच्यापासूनच करक वंश सुरु झाला असंही मानलं जातं. जिमी भागात या वंशाचे लोक आहेत. कोरियामध्ये परंपरेनुसार वडिलांचे आडनाव लावलं जातं. मात्र तेव्हा सुरीरत्न राणी नाराज झाली. त्यावेळी राजा सुरोने त्याच्या दोन्ही मुलांना राणीचं नाव लावण्याची परवानगी दिली.

करक राजवंशातील लोकांनी राणीने अयोध्येतून नेलेला दगड जतन करून ठेवला आहे. दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष किम दाइ जंग आणि माजी पंतप्रधान किम जोंग पिल यांनी ते करक वंशाचे असल्याचा दावाही केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: princess from Ayodhya married a Korean king Kim Suro says Shin Bong kil