जाधव यांना वकील देण्याची पाक उच्चायुक्तांकडे मागणी

वृत्तसंस्था
बुधवार, 19 एप्रिल 2017

आम्हाला जाधव यांना सुनावलेल्या शिक्षेच्या विरोधात निश्‍चितपणे अपील करायचे आहे. परंतु, जोपर्यंत त्यांच्यावरील आरोपपत्राची अधिकृत प्रत मिळत नाही तोपर्यंत आपण अपील करू शकत नाही

नवी दिल्ली - भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्कराने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेप्रकरणी भारताने आज पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना बोलावून जाधव यांना वकील देण्याची पुन्हा मागणी केली. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानचे उच्चायुक्त सय्यद हैदर शाह यांना बोलावून घेतले होते. जाधव हे निष्पाप असून, त्यांच्याविरोधात खोटे गुन्हे लावण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले. भारताचे राजदूत गौतम बंबावाले यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवाची भेट घेऊन जाधव यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या अधिकृत आरोपपत्राची मागणी केल्यानंतर पाच दिवसांनी शाह यांना बोलावून घेण्यात आले आहे.

""आम्हाला जाधव यांना सुनावलेल्या शिक्षेच्या विरोधात निश्‍चितपणे अपील करायचे आहे. परंतु, जोपर्यंत त्यांच्यावरील आरोपपत्राची अधिकृत प्रत मिळत नाही तोपर्यंत आपण अपील करू शकत नाही,'' असे बंबावाले यांनी पाकच्या परराष्ट्र सचिवाच्या भेटीनंतर सांगितले होते.

जाधव यांना वकील देण्याबाबत पाकिस्तानने बदललेल्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करून बंबावाले म्हणाले, ""आपण वकील देण्याबाबत त्यांच्याकडे 13 वेळा मागणी करूनही त्यांनी ती मान्य केलेली नाही. जाधव भारतीय नागरिक असल्याने आंतरराष्ट्रीय कायदा आणि मानवतावादी भूमिकेतून त्यांना वकील देण्याची आपण ठोसपणे मागणी केली आहे.'

Web Title: Provide Lawyer to Jadhav, demands India