क्वेट्टा शहराची मूक श्रद्धांजली

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 ऑक्टोबर 2016

क्वेट्टा : क्वेट्टा येथील पोलिस प्रशिक्षण अकादमीवरील "इसिस'च्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 61 तरुण पोलिस प्रशिक्षणार्थींना संपूर्ण शहराने सर्व व्यवहार बंद ठेऊन श्रद्धांजली वाहिली.

क्वेट्टा : क्वेट्टा येथील पोलिस प्रशिक्षण अकादमीवरील "इसिस'च्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 61 तरुण पोलिस प्रशिक्षणार्थींना संपूर्ण शहराने सर्व व्यवहार बंद ठेऊन श्रद्धांजली वाहिली.

भीषण हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी (बुधवारी) अवघ्या क्वेट्टा शहरातील नागरिकांनी बंद पाळून मृत्युमुखी पडलेल्या तरुणांना श्रद्धांजली अर्पण केली. शहरातील रस्ते रिकामे होते. संपूर्ण शहरात शांतता होती. तसेच सर्व सरकारी संस्थांवरील ध्वज अर्ध्यावर उतरविण्यात आले होते. सर्व दुकाने आणि बाजारपेठा बंद होत्या. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या मृतदेहांवर क्वेट्टामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. काहींचे मृतहेद त्यांच्या मूळ गावी नेण्यात आले होते.

या हल्ल्यात सहभागी असलेल्यांना शोधून काढण्यासाठी तपास यंत्रणांवर दबाव आणण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय व धार्मिक राजकीय पक्षांनी क्वेट्टामध्ये बंदची हाक दिली होती. त्यास प्रतिसाद देत शहरातील सर्व व्यवहार आज बंद ठेवण्यात आले. तसेच, सर्व सरकारी कार्यालयही बंद होती. दशकापेक्षा अधिक काळापासून दहशतवादी हल्ले आणि वांशिक हत्याकांडाचा सामना करावा लागलेल्या बलुचिस्तान प्रांतातील अनेक शहरांत आज व्यवहार बंद ठेवण्यात आले. बलुचिस्तानच्या प्रांतिक सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. पोलिस प्रशिक्षण अकादमीवरील दहशतवादी हल्ल्याची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली चौकशी पथक तयार करण्यात आले असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले.

Web Title: Quetta shuts down for a day; protests against terror attack