वर्णद्वेषातून भारतीय पाद्रीवर मेलबर्नमध्ये हल्ला

वृत्तसंस्था
सोमवार, 20 मार्च 2017

प्रार्थनेचा कार्यक्रम सुरू असताना हल्लेखोर आरोपी पुढे आला आणि 'तू भारतीय आहेस. त्यामुळे तू सामूहिक प्रार्थना घेऊ शकत नाही,' असे तो ओरडला.

तिरुअनंतपुरम : केरळमधील एक कॅथॉलिक ख्रिश्चन पाद्री मेलबर्न येथील चर्चमध्ये रविवारची सामूहिक प्रार्थना घेत असताना वर्णद्वेषातून त्यांच्यावर एका इटालियन व्यक्तीने हल्ला केला. भारतीय असल्याने त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला.  

टॉमी मॅथ्यू असे त्या केरळच्या पाद्रीचे नाव आहे. "मेलबर्नच्या उपनगर भागातील एका कॅथॉलिक चर्चमध्ये एका इटालियन व्यक्तीने स्वयंपाकघरातील चाकूने मॅथ्यू यांच्या मानेवर वार केला," असे मेलबर्न येथील एका दैनिकाचे संपादक तिरुवल्लोम भासी यांनी सांगितले. भासी हे तिरुअनंतपुरमच्या दौऱ्यावर आले असून त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. 

"प्रार्थनेचा कार्यक्रम सुरू असताना हल्लेखोर आरोपी पुढे आला आणि 'तू भारतीय आहेस. त्यामुळे तू सामूहिक प्रार्थना घेऊ शकत नाही,' असे तो ओरडला," असे भासी यांनी सांगितले. 

इटालियन हल्लेखोराला मेलबर्न पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित पाद्री मॅथ्यू यांच्या जिवावरील धोका टळला आहे असे सांगण्यात आले.
 

Web Title: racist attack on Kerala Priest By Italian In Melbourne