‘राफेल’च्या भात्यात आधुनिक क्षेपणास्त्रांचे बाण

पीटीआय
Monday, 7 October 2019

प्रतिकूल हवामानात मारा
मेटिऑर हे दुसऱ्या पिढीतील हवेतून हवेत मारा करण्याची क्षमता असणारे बीव्हीआर क्षेपणास्त्र आहे, ॲक्‍टिव्ह रडार यंत्रणेमुळे प्रतिकूल हवामानामध्येही ते विमानावरून डागता येऊ शकते. वेगवान अशा लहान विमानांपासून ते ड्रोनसारख्या उपकरणांचाही हे विमान सहज वेध घेऊ शकेल.

पॅरिस - अतिवेगवान अशा राफेल या लढाऊ विमानांची मारक क्षमता अधिक असल्याने हवाई संरक्षणक्षेत्रातील भारताचा दबदबा आणखी वाढणार आहे. राफेल या विमानावर मेटिऑर आणि स्काल्प ही अत्याधुनिक क्षेपणास्त्रे बसविण्यात आली असल्याने यामुळे हवाई दलाच्या सामर्थ्यामध्ये भर पडेल असे युरोपमधील आघाडीची क्षेपणास्त्र निर्मिती करणारी संस्था ‘एमबीडीए’ने जाहीर केले आहे.

नजरेपलीकडील लक्ष्य भेदण्याचे सामर्थ्य असणारे मेटिऑर हे क्षेपणास्त्र हवेतून हवेत मारा करू शकते, स्काल्प हे क्षेपणास्त्र या विमानावरील अन्य शस्त्रसाठ्याचा मुख्य आधार असेल, असे कंपनीकडून सांगण्यात आले. भारताच्या लष्करी सामर्थ्यामध्ये प्रथमच या दोन नवीन गोष्टींची भर पडत असून पूर्वी हे घटक कधीही भारताच्या शस्त्रसंपदेचे भाग नव्हते, असे ‘एमबीडीए’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.  स्काल्प हे क्षेपणास्त्र दीर्घपल्ल्याचे असून ते खोलवर मारा करू शकते. पूर्वनियोजित हल्ल्यांमध्ये हे क्षेपणास्त्र प्रभावी शस्त्र ठरते, या माध्यमातून शत्रूंच्या ठाण्यांना सहज नेस्तनाबूत करता येते. आखाती युद्धामध्ये ब्रिटन आणि फ्रान्सच्या हवाईदलाने याच क्षेपणास्त्राचा अधिक प्रभावीरीतीने वापर केला होता.

अन्य उपकरणे
याशिवाय इस्रायली हेल्मेट माउंटेड डिस्प्ले, रडार वॉर्निंग रिसिव्हर, लो बॅंड जॅमर्स, दहा तासांच्या उड्डाणाची नोंद ठेवणारे उपकरण, इन्फ्रारेड सर्च आणि ट्रॅकिंग यंत्रणा या विमानामध्ये असतील. विशेष म्हणजे मागील पाच दशकांत एमबीडीएनेच भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलास क्षेपणास्त्रांचा पुरवठा केला आहे.

राजनाथसिंहांचे फ्रान्समध्ये शस्त्रपूजन
नवी दिल्ली - ‘राफेल’ या लढाऊ विमानांची पहिली तुकडी ताब्यात घेण्यासाठी फ्रान्स दौऱ्यावर जाणारे संरक्षणमंत्री राजनाथसिंह हे तेथेही परंपरेप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. गृहमंत्री असतानादेखील राजनाथ यांनी शस्त्रपूजनाची परंपरा कायम ठेवली होती. आता संरक्षणमंत्री या नात्याने ते फ्रान्स दौऱ्यावर जाणार असून, तेथेही शस्त्रांचे पूजन करतील, अशी माहिती संरक्षण मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने दिली.

फ्रान्स दौऱ्यामध्ये राजनाथ हे मंगळवारी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांची भेट घेणार असून, त्यानंतर ते पहिले राफेल विमान ताब्यात घेण्यासाठी बोर्डोलास रवाना होतील. दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी हेदेखील दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन करत असत. पारंपरिक आणि आधुनिक अशी दोन्ही शस्त्रे पूजनासाठी ठेवली जातात. दरम्यान राफेल विमानाच्या पहिल्या चाचणीला ‘आरबी-०१’ असे नाव देण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rafale plane Modern missiles