राजगौरी पवारचा बुद्ध्यांक आइन्स्टाइनपेक्षाही जास्त

राजगौरी पवारचा बुद्ध्यांक आइन्स्टाइनपेक्षाही जास्त

बुद्‌ध्यांक चाचणीत मिळवले १६२ गुण; ‘ब्रिटिश मेन्सा’मध्येही प्रवेश; अल्पवयात नवा विक्रम

लंडन/बारामती - विविध कामांनिमित्त परेदशामध्ये स्थायिक झालेले अनिवासी भारतीय कर्तृत्व आणि पराक्रमाच्या बळावर यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करताना दिसतात. ‘आयटी’ उद्योगापासून भौतिक विषयातील संशोधनापर्यंत, राजकारणापासून ते मनोरंजनापर्यंत अशा अनेकविध क्षेत्रांमध्ये भारतीयांनी स्वत:ला सिद्ध केले आहे. 

आता मूळची बारामतीची आणि सध्या ब्रिटनमध्ये वास्तव्यास असलेल्या राजगौरी सुरजकुमार पवार हिने ‘ब्रिटिश मेन्सा’ बुद्‌ध्यांक चाचणीमध्ये १६२ गुण मिळवत नवा विक्रम केला आहे. यामुळे राजगौरीचा बुद्‌ध्यांक थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन आणि स्टीफन हॉकिंग यांच्यापेक्षाही दोन गुणांनी अधिक भरला आहे.

अवघे बारा वर्षे वय असणाऱ्या राजगौरीने उच्च बुद्‌ध्यांकासाठी ओळखल्या जाणाऱ्या जगप्रसिद्ध ‘ब्रिटिश मेन्सा’ या संस्थेचे सदस्यत्वही मिळवले आहे. मागील महिन्यामध्ये मॅंचेस्टरमध्ये झालेल्या ‘ब्रिटिश मेन्सा आयक्‍यू’ परीक्षेत राजगौरी सहभागी झाली होती. या परीक्षेमध्ये तिला १६२ गुण मिळाले होते. एखाद्या अठरा वर्षांखालील मुलीने एवढे गुण संपादन करणे हा विक्रमच समजला जातो. ‘चेशायर काउंटी’मधील एक टक्का विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती, त्यात राजगौरीही होती. ब्रिटनमध्ये ज्यांचा बुद्‌ध्यांक अत्युच्च समजला जातो, अशा २० हजार व्यक्तींमध्ये १५०० विद्यार्थी असून, त्यात राजगौरीचाही समावेश आहे. 

राजगौरीला डॉक्‍टर व्हायचंय
राजगौरीचे वडील डॉ. सूरजकुमार पवार हे मूळचे बारामतीचे. मॅंचेस्टर विद्यापीठातील नोकरीच्या निमित्ताने ते ब्रिटनमध्ये स्थायिक झाले. सध्या ते तेथे शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असून, त्यांच्या सौरऊर्जेच्या संशोधनाची ब्रिटन सरकारनेही दखल घेतली आहे. आता बुद्‌ध्यांक परीक्षेत सर्वोत्तम गुण प्राप्त करणारी सर्वांत लहान वयाची मुलगी ठरण्याचा मानही राजगौरी हिला मिळाला आहे. राजगौरीला भविष्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचे असल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले. 

राजगौरीसारख्या एका बारा वर्षांच्या मुलीने शास्त्रज्ञांपेक्षाही अधिक बुद्‌ध्यांक प्राप्त करणे, ही बाब बारामतीकर आणि भारतीयांसाठी अभिमानाची आहे. या परीक्षेपूर्वी मी काहीसा नाराज होतो; पण आता निकालानंतर माझ्या आनंदास पारावार राहिलेला नाही. तिच्या या यशामध्ये शिक्षकांचेही मोलाचे योगदान आहे.
- सूरजकुमार पवार, राजगौरीचे वडील 

राजगौरीच्या या यशामुळे सर्वांनाच आनंद झाला असून, शाळेमध्येही ती सर्वांचीच आवडती विद्यार्थीनी आहे. आम्हाला तिच्याकडून या यशाची अपेक्षा होती.
- अँड्रयू बारी, गणिताचे शिक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com