हाफीजची सुटका करा- परवेझ मुशर्रफ

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

मुशर्रफ म्हणाले, "माझ्या मते ते पाकिस्तानात किंवा पाकिस्तानबाहेर कुठेही दहशतवादाचा पुरस्कार करत नाहीत. ते तालिबानच्या विरोधात आहेत, त्यामुळे त्यांना अशी शिक्षा केली जाऊ नये."

इस्लामाबाद - मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सुत्रधार व जमात-उद-दवा या संघटनेचा म्होरक्या हाफीज याच्यावरील निर्बंध उठवण्यात यावेत, अशी मागणी पाकिस्तानचे माजी लष्कर प्रमुख जनरल परवेज मुशर्रफ यांनी केली आहे.

पाकिस्तान सरकारने मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा (2008) कुख्यात 'मास्टरमाइंड' हाफीज सईदवर निर्बंध घातले आहेत. 
मात्र, हाफीज सईद सेवा कार्यात व्यग्र असून त्याच्यावर अशा प्रकारे निर्बंध घालणे चुकीचे आहे. त्याची लवकरात लवकर सुटका करण्यात यावी, असे वक्तव्य पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख मुशर्रफ यांनी केले आहे.

पाकिस्तानातील एका वृत्तवाहिनीशी बोलताना मुशर्रफ म्हणाले, "हाफीज सईदशी संबंधित फलाह-ए-इन्सानियत, तसेच जमात-उद-दवा या संघटना तरुणांना घेऊन सेवा आणि कल्याणकारी कार्य करतात. सईद एक चांगल्या प्रकारची स्वयंसेवी संस्था चालवतात. हे लोक दहशतवादी नाहीत. पाकिस्तानमधील भूकंपग्रस्त आणि पूरग्रस्तांसाठी ते काम करतात.

मागील महिन्यात पाकिस्तान सरकारने हाफीज सईदवर प्रवासासंदर्भात निर्बंध घातले होते.तसेच, त्याला शांतता व सुरक्षेला घातक ठरणाऱ्या कृत्यांबद्दल 90 दिवसांसाठी नजर कैदेतही ठेवण्यात आले आहे.
 

Web Title: release hafiz saeed, advocates parvez musharraf